विवाहबंधन, लग्नसंस्थेचे महत्त्व आणि भीती, प्रियकर-प्रेयसी असलेले जोडपे विवाह झाल्यानंतर नवरा-बायकोच्या भूमिकेत शिरतात आणि मग आपला प्रेमविवाह आहे हे सहजपणे विसरून जातात किंवा नव्याची नवलाई संपली की सारे काही दोघांनाही नेहमीसारखेही वाटू लागते या विषयावर प्रकाशझोत टाकणारा ‘शादी के साईड इफेक्ट्स’ हा गमतीदार चित्रपट आहे. फरहान अख्तर, विद्या बालन या वेगळ्या जोडीच्या उत्तम अभिनयामुळे चित्रपट प्रेक्षणीय ठरतो यात संशय नाही. सध्याच्या काळात रोमॅण्टिक कॉमेडी, मारधाडीचे चित्रपट मोठय़ा प्रमाणावर आले आहेत. त्यामध्ये लग्नसंस्थेवर भाष्य करणारे चित्रपटही आले आहेत. परंतु, सध्याच्या मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय समाजातील जोडपी, त्यांचे प्रश्न, मुलांना सांभाळण्यापासून ते घरसंसार चालविण्यापर्यंतचे सगळे बारीकसारीक प्रश्न, त्यात नवरा-बायको दोघांचीही होणारी कुचंबणा, स्वत:साठी वेळ काढण्याची समस्या असो आजच्या समाजातील जोडप्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर गमतीजमतीतून  व्यक्त होणारा परंतु, गर्भित अर्थ असलेला चित्रपट दिग्दर्शकाने बनविला आहे. लग्न, मूल, जबाबदाऱ्या, तडजोडी, त्यामुळे नात्यामध्ये येणारे ताणेबाणे याचे चित्रण मार्मिक पद्धतीने दिग्दर्शकाने केले आहे. लग्न पाहावे करून या उक्तीच्या धर्तीवर संसार पाहावा करून असे सांगणारा हा चित्रपट आहे.
‘प्यार के साईड इफेक्ट्स’ या चित्रपटाचा सीक्वेल असल्यामुळे कलावंत जोडी बदलली असली तरी सिद्धार्थ ऊर्फ सिद् आणि तृषा ही व्यक्तिरेखांची नावे लेखक-दिग्दर्शकाने कायम ठेवली आहेत. सिद्धार्थ आणि तृषा यांचे लग्न होऊन काही काळ लोटला आहे. दोघेही आपापल्या करिअरमध्ये व्यस्त असतात. सिद्धार्थ हा संगीतकार होण्यासाठी धडपडतोय. तर तृषा संसार सांभाळण्यासाठी चांगल्या पगाराची नोकरी करत असते. सिद्धार्थला संगीतकार म्हणून विनातक्रार करिअर करता यावे म्हणून तृषा संसाराची आर्थिक जबाबदारी पेलतेय. करिअर मार्गी लागल्यानंतरच मूल होऊ देण्याचे दोघेही एकमताने ठरवितात. परंतु एक दिवस अचानक तृषा गरोदर असल्याचे दोघांनाही समजते आणि मग त्यावरून दोघांमध्ये किंचीत वाद होतात. अखेरीस गर्भपात करण्यासाठी सिद्धार्थ तृषाला रुग्णालयात घेऊन जातो. ऑपरेशन थिएटरमध्ये तृषा जाते आणि नंतर एकदम एका क्षणात आपण आता या वयातच वडील बनले पाहिजे, तेच योग्य आहे, असे वाटल्यानंतर सिद्धार्थ धावत तृषाजवळ येतो आणि गर्भपात करण्यापासून तिला रोखतो. यथावकाश कन्यारत्न झाल्यानंतर मातृभावनेनुसार तृषाचे सगळे लक्ष कन्या मिलीकडे लागून राहते. मिलीच्या जन्मापूर्वी सिद्धार्थ आणि तृषा एखाद्या हॉटेलमध्ये, पार्टीला एखाद्या नव्याने प्रेमात पडलेल्या युगुलासारखे एकमेकांना भेटून प्रियकर-प्रेयसी या नात्यातली गंमत ताजीतवानी राहण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. ती गंमत तर निघून जाते, उलट सिद्धार्थला तृषा गृहीत धरतेय, असे सिद्धार्थला वाटू लागते. त्यावरून त्यांच्यात बारीकसारीक कुरबुरी होतात.
आधी प्रियकर-प्रेयसी आणि नंतर नवरा-बायको बनल्यानंतरही सिद्धार्थ आणि तृषा यांचे मैत्रीचे, प्रेमाचे नाते ताजेतवाने राहते आणि मिलीच्या आगमनानंतर त्यात फरक पडतो. या नात्याचा वेध गमतीदार तरी मार्मिक पद्धतीने दिग्दर्शकाने घेतला आहे. सिद्धार्थ-तृषा दोघेही एकमेकांशी मनाने जवळ असले तरी दोघेही स्वचा शोध घेत राहतात. स्वत:ची ‘स्पेस’ शोधण्याचा प्रयत्न करतात यावर दिग्दर्शकाने भर दिला असून नकळतपणे भाष्यही करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. नवरा-बायको म्हणून वागत असतानाही स्वत:ची ‘स्पेस’ कशी मिळवायची, कुटुंब-संसार सुखी व्हावा, आनंदी राहावा, मूल झाल्यानंतर त्यालाही वेळ कसा द्यावा यासारख्या छोटय़ा छोटय़ा समस्यांवर मार्ग काढणारा गुरू त्याला राम कपूरच्या रूपाने भेटतो. राम कपूरचा फॉम्र्यूला स्वीकारताना सिद्धार्थची फसगत होते. शेखर नावाचा नवीन शेजारी अवतरतो आणि तृषा व शेखर यांच्यात तर प्रेमसंबंध जुळणार नाहीत ना याची त्याला धास्ती वाटते. अशा सगळ्या ठरीव पण गमतीदार वळणांनी चित्रपट साकारतो. रोमॅण्टिक कॉमेडी या तद्दन प्रकारापेक्षा वेगळ्या बाजाने दिग्दर्शकाने मांडणी केली असून ती चांगली जमली आहे. सिद्धार्थ तृषाला आपण कामात व्यस्त असल्याच्या नावाखाली काय करत होतो हे सत्य सांगतो तेव्हा ती त्याला घरातून बाहेर काढते आणि मग तो माफी मागण्यासाठी आलिशान अतिउच्च मध्यमवर्गीय सोसायटीत असलेल्या १८ व्या मजल्यावरील आपल्याच घराच्या वऱ्हांडय़ात लिफ्टजवळ बसून राहतो ही मात्र दिग्दर्शकाची फिल्मीगिरी पटत नाही. कारण अतिश्रीमंत नव्हे पण अतिउच्च मध्यमवर्गीय गटातील जोडपे दिग्दर्शकाने दाखविल्यामुळे असे सिद्धार्थचे घराबाहेर ठिय्या देऊन बसणे रुचणारे नाही.
सिद्धार्थ ही प्रमुख व्यक्तिरेखा संगीतकार असल्यामुळे त्याअनुषंगाने चित्रपटातील संगीत श्रवणीय नाही. सिद्धार्थ-तृषाचे अठराव्या मजल्यावरील घर, घरातील ऑडिओ रूम याची रचना आणि त्याला अनुरूप असे सेट डिझाइन दिग्दर्शकाने दाखविले आहे.
फरहान अख्तरची मिल्खा सिंग ही भूमिका आणि विद्या बालनची डर्टी पिक्चर चित्रपटातील भूमिका यामुळे दोघांकडे पाहण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यानंतर आलेल्या या चित्रपटात दोघांकडून असलेल्या अपेक्षांच्या कसोटीवर दोघेही कलावंत खरे ठरले आहेत. अतिशय अनुरूप जोडप्यापेक्षा फरहान-विद्या यांची या चित्रपटातील जोडी, त्यांचा अभिनय याला दाद द्यायला हवी. प्रमुख व्यक्तिरेखांव्यतिरिक्त कामवाली बाई, तृषाची आई, तृषा-सिद्धार्थ यांचा मित्र अशा मोजक्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातूनही दिग्दर्शकाने चित्रपट फुलवला आहे.
शादी के साईड इफेक्ट्स
निर्माते – शोभा कपूर, एकता कपूर, प्रीतीश नंदी
लेखक – दिग्दर्शक – साकेत चौधरी
संवाद – अर्शद सय्यद
छायालेखन – मनोज लोबो, ऋषी पंजाबी
संगीतकार – प्रीतम
कलावंत – फरहान अख्तर, विद्या बालन, इला अरुण, पूरब कोहली, वीर दास, राम कपूर, गौतमी गाडगीळ, रती अग्निहोत्री, मिया मालझर.

Story img Loader