बॉलिवूडमधील मोठय़ा बॅनरचे चित्रपट गेले वर्षभर अनिश्चित स्थितीत घुटमळत होते. मोठे कलाकार एकमेकांशी जणू  आटय़ापाटय़ाचा खेळ खेळत आहेत अशा पद्धतीने सारखे या चित्रपटातून त्या चित्रपटात, या दिग्दर्शकाकडून त्या दिग्दर्शकाकडे कोलांटय़ा उडय़ा मारत होते. त्यात करण जोहरसारख्या नामांकित दिग्दर्शकांच्याही चित्रपटात नावाजलेले कलाकार असावेत की पुन्हा आपले नवीन ‘स्टुडंट’ घ्यावेत यावरून उडालेला गोंधळ या सगळ्यामुळे  ‘शुद्धी’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘जांबाज’ अशा चांगल्या चित्रपटांची कोंडी झाली होती. मात्र, अगदी महिन्याभरात कलाकारांची प्यादी मागेपुढे करून संबंधितांनी आपापल्या चित्रपटांचा मार्ग चुटकीसरशी मोकळा करून घेतला आहे.
करण जोहरच्या ‘शुद्धी’ने गोंधळाच्या बाबतीत आघाडीच उघडली होती. अमिष त्रिपाठीच्या बेस्टसेलर ‘शिवा’ त्रिसूत्रीचे हक्क विकत घेऊन करणने ‘शुद्धी’चा घाट घातला तेव्हा हृतिक रोशन त्याचा ‘शिवा’ होता. हृतिकचे एक पोस्टरही तयार करण्यात आले होते. पण, ‘बँग बँग’च्या सेटवर झालेल्या मेंदूच्या दुखापतीमुळे हृतिकला सक्तीची विश्रांती घ्यावी लागली आणि चित्रपट सुरू  होण्याआधीच रखडला. तो रखडल्यानंतर आपल्याला या चित्रपटासाठी थांबायला वेळ नाही म्हणत करीना कपूर त्यातून बाहेर पडली. दरम्यानच्या काळात ह्रतिक बरा झाला आणि त्याने ‘बँग बँग’चे चित्रिकरण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, खुद्द करणनेही ‘शुद्धी’ थांबवणे शक्य नाही म्हटल्यावर ह्रतिकही या चित्रपटातून बाहेर पडला. तेव्हापासून करण आपल्या चित्रपटासाठी नायकाच्या शोधात होता. तो अगदी आमिपर्यंतही पोहोचला. मात्र, आता या क्षणाला सलमान खानवर त्याने ‘शिवा’ म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. गंमत म्हणजे करणला सलमानबरोबर चित्रपट करायचा होता ती संधी ‘शुद्धी’मुळे मिळाली. तर दीपिकाला सलमानची नायिका व्हायचे आहे म्हणून तिने या चित्रपटासाठी काहीही करून तारखांची जुळवाजुळव करायची तयारी असल्याचे करणला कळवले आहे.असाच प्रकार संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’च्या बाबतीत घडला. या चित्रपटाची घोषणा दोन-तीन वर्षांपूर्वी झाली तेव्हा भन्साळींच्या मनात सलमान आणि करीना ही जोडी होती. मात्र ‘गुझारिश’वरून सलमानने केलेले वक्तव्य भन्साळींना एवढे झोंबले की त्यांची सलमानशी असलेली मैत्री संपुष्टात आली. ‘राम-लीला’ यशस्वी झाल्यावर रणवीर आणि दीपिका या पडद्यावर-पडद्याबाहेर लोकप्रिय जोडीलाच ‘बाजीराव मस्तानी’ म्हणून आणण्याचा निर्णय भन्साळींनी घेतला असून आता तिसरा कोन म्हणून प्रियांका चोप्राही या चित्रपटात दाखल झाली आहे. यशराजने ‘बँक चोर’मधून कपिल शर्माची हकालपट्टी केल्यानंतर सुनील ग्रोव्हर किंवा अली असगर यांची नावे पुढे आली होती. प्रत्यक्षात, यशराजने रितेश देशमुखला आपला हिरो निवडून ‘लय भारी’ गेम केला आहे. संजय गुप्तालाही आपल्या ‘जांबाज’ चित्रपटात ऐश्वर्याबरोबर कोण? या प्रश्नावर जॉन अब्राहम हे उत्तर मिळाले आहे.

Story img Loader