‘बायोपिक’ चित्रपटांची सध्या बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा सुरू असते. सिंधुताई सपकाळ, मिल्खा सिंग, मेरी कोम, डॉ. प्रकाश आमटे-डॉ. मंदाकिनी आमटे आदी विविध क्षेत्रांतील दिग्गजांचे तसेच खेळाडूंचे चरित्रपट यशस्वी ठरल्यामुळे या चित्रपट प्रकाराला सुगीचे दिवस आले आहेत. आता तर हॉकीपटू संदीप सिंग आणि वादग्रस्त ठरलेला क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांचे चरित्रपटही येणार असल्याची चर्चा रंगली आहे.
फरहान अख्तरचा ‘भाग मिल्खा भाग’ यशस्वी ठरल्यानंतर विशेषकरून या चित्रपट प्रकाराकडे वळण्याचे धाडस निर्माते-दिग्दर्शक करू लागले आहेत. मोहम्मद अझरुद्दीनची भूमिका इमरान हाश्मी करणार असून अभिनेत्री आणि अझरुद्दीनची पत्नी संगीता बिजलानी हिच्यावर बेतलेली भूमिका करिना कपूर साकारणार असल्याची चर्चा रंगली आहे.
करिना कपूरला म्हणे आता दुय्यम भूमिका करून कंटाळा आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन टोनी डिसुजा करणार असून पटकथेमध्ये अझरुद्दीनच्या बायकोच्या व्यक्तिरेखेची लांबी किती आहे त्यावर म्हणे होकार द्यायचा की नाही हे बेबो ठरविणार आहे. आता मुख्य नायिकेच्या भूमिका करण्याची संधी मिळत नसताना, नायककेंद्री सिनेमांमध्ये निदान साहाय्यक भूमिका करण्यावर समाधान मानायचे हे पचविणे बेबोला जड जात आहे हे उघडच आहे. म्हणूनच आतापर्यंत कधीही न साकारलेली वास्तवातील व्यक्तिरेखेवर बेतलेली भूमिका साकारण्याचे आव्हान म्हणे करिना कपूर पेलणार आहे. अशीच बायोपिक चित्रपट करण्याची भुरळ अभिनेत्री चित्रांगदा सिंगला पडली आहे.
वेगळ्या पठडीतील ‘बोल्ड’ व्यक्तिरेखांसाठी तिचे नाव घेतले जाते. आता म्हणे तिला निर्माती व्हायचंय. आणि तेसुद्धा हॉकीपटू संदीप सिंगच्या चरित्रावर चित्रपट करायचा आहे. भारतीय हॉकी संघाचा माजी कप्तान संदीप सिंग काही वर्षांपूर्वी रेल्वे अपघातात जखमी झाला होता. व्हीलचेअरवर तो दोन वर्षे होता. अशा स्थितीतून तो पूर्ण बरा झाला. एवढेच नव्हे तर त्याने पुन्हा एकदा हॉकी संघात आपले पूर्वीचे स्थान मिळविले आणि उत्तम खेळ केला. म्हणून संदीप सिंगचे व्यक्तिमत्त्व नक्कीच प्रेरणादायी असून त्याच्या जीवनसंघर्षांवर चित्रपट करायचे चित्रांगदा सिंगने ठरविले आहे. आता बायोपिक चित्रपट करण्याची प्रेरणा चित्रांगदाला कुठून मिळाली असा प्रश्न सहजपणे मनात येतो. तर सध्या चित्रांगदा सिंग स्वत: किक् बॉक्सिंगचा सराव करीत असून कोणताही क्रीडा प्रकार हा फिटनेससाठी उत्तम असतो, असे मत झाल्यावर संदीप सिंगचे जीवन चित्रपटातून दाखविण्याचा विचार आपण केल्याचे तिने म्हटले आहे.
माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन याची कारकीर्द वादळी ठरल्यामुळे त्याच्यावर चित्रपट करण्याचे दिग्दर्शकाने ठरविले असावे. एकूण काय तर सध्या चरित्रपटांची ‘चलती’ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा