हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांना चित्रपट हिट की सुपरहिट ही गणितं नाही म्हटलं तरी तपासावीच लागतात. एखाद्याच्या चित्रपटाने आर्थिक कमाईच्या बाबतीत कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली की साहजिकच त्याचा परिणाम इतरांवरही होतो. नुकतेच शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाने १००० कोटी रुपयांचा पल्ला पार केला. शाहरुखचं कौतुक करतानाच अभिनेता सलमान खानने कमाईच्या बाबतीत शे-दोनशे कोटींचा जमाना गेला. आता हजार कोटी हे नवं समीकरण असल्याचं स्पष्ट केलं. सलमानचा ‘टायगर ३’ दिवाळी प्रदर्शनाच्या तयारीत आहे. ‘मिशन रानीगंज’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधणाऱ्या अभिनेता अक्षय कुमारलाही हाच प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा कोणत्याही चित्रपटावर आर्थिक कमाईचं असं दडपण आणण्यात अर्थ नाही, अशी सावध भूमिका त्याने घेतली. मात्र हिंदी चित्रपटांना सध्या यशाची नवी समीकरणे खुणावू लागली आहेत हेही त्याने मान्य केलं.
‘अमुक चित्रपट तमुकप्रमाणे कमाई करेल असा विचार करून दडपण आणण्यात काही अर्थ नाही. चित्रपटाच्या फक्त व्यावसायिक बाजूचा विचार करून चालणार नाही. आर्थिक यशापलीकडे जाऊन काही गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या असतात’ अशी काहीशी सावध भूमिका अक्षयने मांडली. मात्र ‘जवान’ आणि ‘गदर २’ प्रमाणे अन्य बॉलीवूडपटांनाही असं प्रचंड यश मिळवता येईल अशी आशाही त्याने व्यक्त केली. ‘शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाने इतका उत्तम व्यवसाय केला याचा आनंद आहे. ‘गदर २’, ‘ओएमजी २’ या चित्रपटांनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला हे आपल्या चित्रपट व्यवसायाच्या दृष्टीने खूप छान झालं आहे. करोनाच्या एका वाईट टप्प्यातून बाहेर पडल्यानंतर चित्रपटांनी आर्थिक यशाचा हजार कोटींचा नवा मापदंड निर्माण केला आहे.
ज्या पद्धतीच्या कथा-पटकथा आणि सिनेमे आपल्याकडे आहेत ते त्यांच्याकडेही नाहीत. त्यामुळे आता हॉलीवूडपटांप्रमाणे आपणही दोन ते तीन हजार कोटींचा व्यवसाय करू शकू अशी आशा मला वाटते’ अशी भावना अक्षयने व्यक्त केली. कलाकार म्हणून यशस्वी चित्रपट देणं गरजेचं असलं तरी सामाजिक विषय मांडणारे वा पठडीबाज चित्रपटांपेक्षा वेगळे चित्रपट करायला आपल्याला आवडतात असं त्याने सांगितलं. ‘मी जेव्हा ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ आणि ‘पॅडमॅन’ सारखे चित्रपट केले त्यावेळी सगळय़ांनी माझी वेडा म्हणूनच गणना केली होती, पण हे दोन्ही चित्रपट तिकीट खिडकीवरही प्रचंड यशस्वी ठरले आणि प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांचीही पसंती त्यांना मिळाली’ असं त्याने सांगितलं.
‘मला नियम कळत नाहीत..’
‘ओएमजी २’ या चित्रपटाला प्रौढ प्रमाणपत्र मिळाले. ज्या वयोगटातील मुलांपर्यंत हा विषय पोहोचायला हवा होता त्यांच्यापर्यंत तो पोहोचू शकला नाही, याबद्दल त्यालाही वाईट वाटतं. पण यासाठी सेन्सॉर बोर्डाबरोबर भांडायची आपली इच्छा नाही असं त्याने सांगितलं. मुलांसाठी महत्वाचा असलेला विषय संयत पद्धतीने मांडूनही त्याला प्रौढ प्रमाणपत्र द्यावं असं वाटत असेल तर मला त्यांचे नियमच कळत नाहीत. मी नियमांत डोकं खुपसून बसणार नाही, मला त्यांच्याशी भांडण्यात रस नाही. ज्यांना ज्यांना हा चित्रपट दाखवला त्यांना सगळय़ांना तो आवडला. आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर येणार आहे, त्यामुळे मी खूश आहे. लोकांना त्या विषयाची माहिती असायलाच हवी, असं आग्रही मत त्याने व्यक्त केलं. ओटीटीवरचं त्याचं पदार्पणही लांबलं आहे, पण त्याची त्याला घाई नाही. पुढच्या वर्षीच्या सुरुवातीलाच तो ‘सिंघम ३’ आणि ‘वेलकम टु द जंगल’ या चित्रपटांचं चित्रीकरण सुरू करणार असल्याचं त्याने सांगितलं.
‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हे शीर्षक ऐकल्यानंतर सगळय़ांना धक्का बसला. तू वेडा झाला आहेस का? शौचालयावर कोण चित्रपट करतं आणि तू अशा चित्रपटात काम करणार आहेस? असे प्रश्न मला लोकांनी विचारले. मला त्यांना सगळय़ांना एकच सांगायचं आहे. माझे चित्रपट काय व्यवसाय करणार किंवा ते कसे आहेत हे सांगून माझं खच्चीकरण करू नका. उलट अशा विषयांवरचे चित्रपट बनतायेत आणि ते आपण आपल्या मुलांना दाखवतो आहोत यासाठी किमान मला धैर्य द्या. समाजाने बदलायची हीच वेळ आहे. -अक्षय कुमार