ट्रिपल तलाकपासून मुस्लिम महिलांची सुटका व्हावी म्हणून नरेंद्र मोदी सरकार नियम करत आहेत. मात्र तरीदेखील मुस्लिम महिलांची ट्रिपल तलाकपासून अद्यापही सुटका न झाल्याचं पाहायला मिळत आहे. याचा प्रत्यय नुकताच एका अभिनेत्रीला आला आहे. इंदूरमध्ये एका अभिनेत्रीला तिच्या पतीने १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर तलाकनामा पाठविला आहे. याप्रकरणी अभिनेत्रीने तक्रार दाखल केली आहे.

पतीविरोधात तक्रार दाखल करणारी अभिनेत्री भोजपुरी चित्रपटसृष्टीत कार्यरत असून रेशमा शेख उर्फ अलीना असं या अभिनेत्रीचं नाव आहे. रेशमाच्या पतीने तिला १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर तलाकनामा पाठवून तिला तलाक दिला आहे. मात्र हा एकतर्फी निर्णय असल्याचं सांगत अलीनाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.


‘माझे पती मुदस्सिर बेग (३४) यांनी १७ जुलै रोजी मला १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपर पाठविला. या पेपरवर तलाक -ए-बाईन ( इस्लामी शरियतच्या काही नियमांप्रमाणे तलाकचा एक प्रकार ) देत लग्नाच्या बंधनातून सुटका केल्याचं नमूद केलं होतं, असं अलीनाने तिच्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अलीनाने हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं असून २०१६ मध्ये तिने मुदस्सिरसोबत लव्ह मॅरेज केलं होतं. विशेष म्हणजे लग्नानंतर अलीनाने कलाविश्वाकडे पाठ फिरवली आहे. अलीनाला दोन महिन्यांचा लहान मुलगादेखील आहे. त्यामुळे तिने तलाक नको असल्याचं म्हटलं आहे.