‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एकीकडे दीपिकाने या गाण्यामध्ये घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. दीपिकाने परिधान केलेल्या बिकिनीवरून देशभरात राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. यावर विविध प्रतिक्रिया उमटत असताना आता भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यावर भाष्य केले आहे.

भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली. यावेळी त्यांनी या चित्रपटाच्या वादात उडी घेतली. ‘जर तुम्ही हिंदू असाल, तर हा चित्रपट पाहू नका’, असे आवाहन साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले आहे.
आणखी वाचा : “आमचे पैसे…” चित्रपट बॉयकॉट करण्यावरुन पुष्कर श्रोत्रीने राम कदमांना दिले खुले चॅलेंज

“मला त्याच चित्रपटाबद्दल बोलायचं आहे. या चित्रपटातील बेशरम गाण्यातून ज्याप्रकारे भगव्याचा अपमान करण्यात आला आहे, त्यावरुन माझे हिंदूंना आवाहन आहे की, तुम्ही हा चित्रपट बघू नका. जर तुम्ही हिंदू असाल आणि तुम्हाला तुमच्या धर्माचा, रक्ताचा स्वाभिमान असेल, तर हा चित्रपट पाहू नका. तसेच तुमच्या अंगात हिंदूंचे रक्त असेल तर तुम्ही हा चित्रपट पाहणार नाही आणि तो चालू देणार नाही”, असे त्या यावेळी म्हणाल्या.

आणखी वाचा : “…तर आम्ही खपवून घेणार नाही” दीपिकाच्या भगव्या बिकिनीच्या वादावर पुष्कर श्रोत्री स्पष्टच बोलला

दरम्यान ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून सुरू असलेल्या या वादावर यशराज फिल्मकडून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. ‘पठाण’ हा एक अॅक्शन थ्रीलर चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. या चित्रपटात शाहरुख खानबरोबरच दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader