बॉलिवूड आणि दाक्षिणात्य कलाकारांप्रमाणेच मराठीतील अनेक कलाकारांनी अभिनयाव्यतिरिक्त त्यांचा मोर्चा निर्मिती, दिग्दर्शन यांच्याकडे वळविला आहे. लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिनेदेखील अभिनयासोबतच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. लवकरच तिचा ‘मन फकिरा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘मन फकिरा’ हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री सायली संजीव मुख्य भूमिका साकारणार आहेत. सुव्रत ‘भूषण’ ही भूमिका साकारत असून सायली ‘रिया’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे.

‘मन फकिरा’मध्ये सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘प्रेम…आहे, नाही, बहुतेक, वगैरे…’ ही या सिनेमाची टॅगलाईन आहे. तिच्याबाबत उत्कंठा लागली असतानाच नव्याने प्रदर्शित झालेला टीझर या टॅगलाइनबद्दल अंधुकसा खुलासा करतो आणि प्रेक्षकाची उत्कंठा अधिक ताणली जाते. लग्न…त्यांच्यातील प्रेम…त्यांचा संसार… त्यात येणारे ते दोघे… आणि पुन्हा मग विस्कटलेपण असा आशय या टीझरमधून समोर येतो. चित्रपटाची कथा हटके आहे याची खात्री पटते, पण ती नेमकी काय आहे, हे समोर येणार आहे ते चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हाच!

प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये सुव्रत जोशी आणि सायली संजीव यांच्याबरोबर अंजली पाटील, अंकित मोहन हे कलाकारदेखील दिसतात. भूषण-रिया यांचे मराठमोळ्या ‘कांदापोहे’ पद्धतीने लग्न होते आणि त्यानंतर सगळे काही सुरळीत सुरु असताना एका रात्री दोघांचेही भूतकाळ समोर येतात. हे दोघे या सर्व गोष्टीला कसे समजुतदारपणे सामोरे जातात आणि नक्की पुढे काय होतं, ते कोणता निर्णय घेतात. हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळणार आहे.

पर्पेल बुल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमटेड आणि स्मिता फिल्म प्रॉडक्शन्सच्या यांची प्रस्तुती असलेला ‘मन फकीरा’ या चित्रपटाची निर्मिती एस. एन. प्रॉडक्शन्स आणि स्मिता विनय गानु, नितीन प्रकाश वैद्य, ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार आणि किशोर पटेल यांनी केली असून चित्रपटाची सहनिर्मिती तृप्ती कुलकर्णी आणि प्रणव चतुर्वेदी याची आहे.