‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे नवीन पर्व दोन आठवड्यांपूर्वी झी मराठी वाहिनीवर सुरु झाले. या पर्वाची खासियत म्हणजे या पर्वात परिक्षक म्हणून यापूर्वीच्या ‘सा रे ग म लिटिल चॅम्प’च्या पर्वामधून अफाट प्रसिद्धी मिळवलेल्या पंचरत्नांना परिक्षकांच्या खुर्चीत बसवण्यात आलं आहे. या पर्वामध्ये लिटिल चॅम्प्सच्या गाण्याचं परिक्षण करण्याची जबाबदारी रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वंशयपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर या पंचरत्नावर आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मृण्मयी देशपांडे करत आहे. एकीकडे लिटिल चॅम्पला पुन्हा पाहण्याची संधी मिळालेली असतानाच दुसरीकडे मालिकेच्या पहिल्या तीन भागांचं प्रक्षेपण झाल्यानंतर अनेक मिम्स व्हायरल झाले. पाचही परिक्षकांच्या शैलीवर तसेच सूत्रसंचालन करणाऱ्या मृण्मयीच्या शैलीची खिल्ली उडवणारे मिम्स व्हायरल झालेत. असं असतानाच मृण्मयीने ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की पाहा >> कार्तिकी मराठीमधील नेहा कक्कर तर मृण्मयीसहीत ‘पंचरत्ना’ची Over Acting झाली नकोशी; पाहा Viral Memes

सूत्रसंचालन करणाऱ्या मृण्मयीला पाहूनही अनेकांना पूर्वीच्या पर्वांमध्ये सूत्रसंचालन करणाऱ्या पल्लवी जोशीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अनेकांनी यासंदर्भातील मिम्सही शेअर केलेत. अनेकजण सोशल नेटवर्किंगवरुन मृण्मयी सूत्रसंचालन करताना ओव्हर अ‍ॅक्टींग करते अशी टीका केलीय. तशी मृण्मयी सोशल नेटवर्किंगवर फार अ‍ॅक्टीव्ह आहे. ती अनेकदा कार्यक्रमाचे प्रोमो वगैरे शेअर करत असते.

मृण्मयीच्या अशाच एका पोस्टवर एका चाहत्याने सा रे ग म प लिटिल चॅम्पसंदर्भातील कमेंट केली. ‘समोर बसलेले जज आणि अँकर खूपदा वा वा ओरडतात याला ओव्हर अ‍ॅक्टींग म्हणायची का?,’ असं या चाहत्याने मृण्मयीच्या पोस्टवर कमेंट करुन म्हटलं. या कमेंटवर मृण्मयीने सडेतोड उत्तर दिलं आहे. “तुम्ही या मुलांचं गाणं ऐकून काय केलं असतं? हाताची घडी घालून शांत बसला असतात का?,” असा प्रश्न मृण्मयीने तिला ट्रोल करु पाहणाऱ्या या व्यक्तीला केलाय.

मृण्मयीने ट्रोलरला दिलेलं उत्तर

अनेकांनी मृण्मयीचं म्हणणं बरोबर असल्याचं मत या कमेंटखाली व्यक्त केलं आहे. या पोस्टवर मृण्मयी चांगलं काम करत असून तिने रोज एका परिक्षकाकडून गाणं गाऊन घ्यावं अशी इच्छा एकाने व्यक्त केलीय.

ही मालिका सुरु झाल्यापासून सोशल नेटवर्किंगवर पंचरत्नांना खूपच ट्रोल केलं जात आहे. रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वंशयपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर या पंचरत्नावर मिम्स व्हाय़रल झालेत. रोहित अवधूत गुप्तेची नक्कल करतो तर कार्तिकी गायकवाड सतत गाण्यांनंतर रडत असल्याने तिला मराठीतील नेहा कक्कर म्हटल्याचे मिम्स व्हायरल झालेत. त्याचप्रमाणे आर्या आंबेकरला पाहण्यासाठी तरुण पोरं हा शो पाहतात आणि प्रथमेश लघाटे हा महेश काळेंची कॉपी करतो असं म्हणणारे मिम्सही व्हायरल झालेत. परिक्षकांची दाद देण्याची शैलीही सारखीच असल्याचा टोलाही मिम्समधून लगावण्यात आलाय.