भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर आधारित ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक बुधवारी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारा अभिनेता सुशांत सिंग राजपुतने ट्विटरवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. या पोस्टरवर लांब केस असलेला सुशांत सिंग राजपूत एका रेल्वे स्थानकावर बसलेला दाखविण्यात आला आहे. सुशांतने घातलेले पांढऱ्या रंगाचे कपडे आणि टाय पाहता चित्रपटात धोनीच्या शालेय जीवनातील प्रसंग पाहायला मिळण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या शीर्षकात उल्लेख केल्याप्रमाणे ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’मध्ये प्रेक्षकांना महेंद्रसिंग धोनीचा वेगळा जीवनप्रवास पहायला मिळणार आहे.
या चित्रपटात धोनीची भुमिका उत्तरमरित्या वठवण्यासाठी सुशांतने धोनीचे अनेक व्हिडिओज पाहिले होते. याशिवाय, त्याने माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांच्या मार्गदशनाखाली क्रिकेटचे धडेही गिरवले होते. ‘अवेनस्डे’ आणि ‘स्पेशल २६’ या चित्रपटांचा दिग्दर्शक नीरज पांडे याने ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’चे दिग्दर्शन केले आहे.

Story img Loader