फॅशन शो म्हटले की सुंदर आणि आकर्षक डिझाइनचे कपडे घालून रॅम्पवर कॅटवॉक करीत येणाऱ्या मॉडेल्स आपल्या डोळय़ांसमोर येतात. पण मॉडेल्स रॅम्पवर न येता आपल्या हातातील उपकरणाच्या स्क्रीनवर येतील आणि डिझायनरने साकारलेली वस्त्रकला सादर करतील ही प्रत्यक्षात न येणारी कल्पना असल्याचे प्रथमदर्शनी वाटते. मात्र भारतातील तरुण फॅशन डिझायनर्सपैकी एक मसाबा गुप्ता यंदाच्या ‘लॅक्मे फॅशन वीक स्प्रिंग/ रिसॉर्ट-२०१५’मध्ये भारतातील पहिला आभासी फॅशन शो सादर करणार आहे. मसाबाचे संपूर्ण कलेक्शन ‘इंस्टाग्राम’वर दाखविण्यात येणार आहे.
अभिनेत्री नीना गुप्ता आणि क्रिकेटपटू व्हिव रिचर्ड यांची मुलगी डिझायनर मसाबा गुप्ता हिने फॅशन जगतात पाय ठेवताच, आपल्या सशक्त आणि वैशिष्टय़पूर्ण शैलीमुळे समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली. ती भारतातील अग्रगण्य फॅशन ब्रॅण्ड ‘सत्या पॉल’ची मुख्य डिझायनरही होती. यंदा ती स्वत:च्या ‘मसाबा’ या ब्रॅण्डचे कलेक्शन ‘मसाबा ऑन इंस्टाग्राम’ या आभासी शोअंतर्गत सादर करणार आहे. हे कलेक्शन संपूर्णपणे इंस्टाग्रामवर दाखविण्यात येणार आहे. यासाठी मसाबाच्या संपूर्ण कलेक्शनचे फोटोशूट येत्या रविवारीच करण्यात येणार आहे. बुधवारी होणाऱ्या शोच्या वेळी रॅम्पच्या जागेवर मोठय़ा पडद्यावर हे फोटोशूट दाखविले जाणार आहे. तसेच या वेळेस इंस्टाग्रामच्या जगभरातील सदस्यांना हे कलेक्शन ‘लाइव्ह’ पाहता येणार आहे. तंत्रज्ञानाची भुरळ पडलेली तरुण पिढी आपल्या प्रयोगांत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी धडपडत असते. फॅशन जगतही त्याला अपवाद नाही. ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी गुगल आयसारख्या कित्येक गॅजेट्स, सेल्फी ट्रेंड वेळोवेळी रॅम्पवर अवतरले आहेत. मागच्या लॅक्मे फॅशन वीकदरम्यान डिझायनर्सचे कलेक्शन रॅम्पवर सादर झाल्यावर दहा मिनिटांतच अपडेट्स फेसबुकवर आणि संपूर्ण शोचा व्हिडीओही यू टय़ूबवर पाहायला मिळत होता. पण शो थेट एखाद्या समाजमाध्यमांच्या संकेतस्थळावर दाखविण्याची भारतातील ही पहिलीच वेळ आहे. यामुळे संपूर्ण फॅशन जगताचे या शोकडे लक्ष लागले आहे.
मसाबाचा देशातील पहिला आभासी फॅशन शो
फॅशन शो म्हटले की सुंदर आणि आकर्षक डिझाइनचे कपडे घालून रॅम्पवर कॅटवॉक करीत येणाऱ्या मॉडेल्स आपल्या डोळय़ांसमोर येतात.
First published on: 14-03-2015 at 04:30 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msab first illusionary fashion show