‘मेसेंजर ऑफ गॉड’ या डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम यांच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने दणका दिला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनावरच सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटाच्या कथेवर आणि स्वत:ला ‘देव’ संबोधून बाबा राम रहीम यांनी साकारलेल्या भूमिकेवरच सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. चित्रपटाची कथा वादग्रस्त असून यातून समाजात दुफळी निर्माण होऊ शकते, असे सेन्सॉर बोर्डाने म्हटले आहे. दरम्यान, चित्रपटातील जो भाग सेन्सॉर बोर्डाला आक्षेपार्ह वाटत असेल तो भाग काढून टाकण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया बाबा राम रहीम यांनी दिली.
येत्या १६ जानेवारी रोजी हा चित्रपट देशभरातील चित्रपटगृहांमध्ये झळकणार होता. इतकेच नव्हे तर, या चित्रपटाच्या सिक्वलचेही तब्बल ८० टक्के चित्रीकरण पूर्ण झाले होते.
पण काही शिख संस्थानी या चित्रपटाच्या प्रदर्शानाला आपला विरोध दर्शवलेला होता. बाबा राम रहीम यांच्याविरोधात अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अशा व्यक्तीला चित्रपटाद्वारे मोठ केलं जाऊ नये, असे शिख संघटनांचे म्हणणे आहे. या चित्रपटाला परवानगी दिल्यास कायदा-सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ शकते असा इशाराही काही संस्थाकडून देण्यात आला होता.

Story img Loader