‘सतरंगी ससुराल’, ‘कुमकुम भाग्य’, ‘धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे मुग्धा चाफेकर (Mugdha Chaphekar). आपल्या अभिनयानं चर्चेत असणारी मुग्धा दोन दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यातील कारणामुळे चर्चेत आहे. लग्नाच्या नऊ वर्षांनंतर मुग्धाचा घटस्फोट झाला असून, तिचा पूर्वाश्रमीचा पती रविश देसाई (Ravish Desai) याने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट लिहीत याबद्दलची माहिती दिली. या पोस्टमधून त्यानं पती-पत्नी म्हणून आम्ही आमचे वेगळे मार्ग निवडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.
मुग्धा चाफेकर आणि रविश देसाई यांची २०१४ साली ‘सप्तरंगी ससुराल’ मालिकेच्या सेटवर ओळख झाली. त्याचदरम्यान त्यांच्यात प्रेम फुललं. दोन वर्षांनी २०१६ मध्ये जानेवारी महिन्यात त्यांनी साखरपुडा केला. मग त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात दोघं लग्नबंधनात अडकले. आता ९ वर्षांचा संसार केल्यानंतर मुग्धा आणि रविश वेगळे झाले आहेत. त्यांच्या विभक्त होण्याच्या घोषणेनंतर अनेकांनी मुग्धाला जबाबदार म्हटलं आहे. दोघांत तिसरा आल्यानं हे नातं संपल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. यावर रविशनं मत व्यक्त केलं आहे.
याबद्दल रवीशनं व्हिडीओ शेअर करीत असं म्हटलं, “जर एखादं जोडपे वेगळं होत असेल, तर त्यात तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग असणं आवश्यक आहे का? दोन लोकांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि त्याच प्रकारे त्यांनी वेगळं होण्याचाही निर्णय घेतला. आपण हे इतकं सोपं का ठेवू शकत नाही? कारण- काहीही असो, ते नातं आपल्या हृदयात राहू द्या. आम्हाला एकांत द्या. आपण कोणत्याही महिलेच्या सन्मानावर बोट का उचलावं? यातून तुम्हाला काय मिळणार आहे?”

पुढे तो म्हणाला, “बघा, आम्ही खूप साधे लोक आहोत. मला सोशल मीडियावर कोणाशीही भांडायचं नाही. आमचं व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी संपूर्ण आयुष्य गेलं. कृपया सभ्यपणानं वागावं, अशी विनंती आहे. सोशल मीडियावर आधीच बरंच काही चालू आहे. आपण सर्वांशी प्रेमळ आणि दयाळूपणे वागूयात. आपण एकमेकांसाठी एवढं करूच शकतो. ही एक विनंती आहे. कृपया यापासून सध्या दूर राहा आणि आम्हाला एकांत द्या.” दरम्यान, रविशनं त्याच्या या प्रतिक्रियेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरून डिलीट केला आहे.
शनिवारी (५ एप्रिल) रविशने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात त्यानं “खूप विचार आणि चिंतनानंतर मुग्धा व मी पती-पत्नी म्हणून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःचा मार्ग अवलंबला आहे. याला एक वर्षाहून अधिक काळ उलटला आहे. प्रेम, मैत्री आणि एकमेकांविषयी आदर, असा हा आमचा सुंदर प्रवास होता. आयुष्यभर हे सर्व आमच्यासोबत राहील” असं म्हटलं होतं. त्यानं ही पोस्ट डिलीटही केली आहे.