अनंत अंबानी (Anant Ambani) व राधिका मर्चंट (Radhika Merchant) शुक्रवारी (१२ जुलै रोजी) लग्नबंधनात अडकले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नाला फक्त भारतातील नाही तर जगभरातील व्हीव्हीआयपी पाहुणे उपस्थित राहिले. बॉलीवूड सेलिब्रिटी, दाक्षिणात्य सेलिब्रिटींसह आंतरराष्ट्रीय स्टार्स, तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक पाहुणे या लग्नाला आले होते.
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नातील बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अगदी दोघांच्या लूकपासून ते लग्न स्थळाची सजावट व सेलिब्रेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत. यापैकीच एका व्हिडीओत उद्योगपती मुकेश अंबानी भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. वर अनंत अंबानीचे वडील धाकट्या सूनेच्या पाठवणीत वेळी भावुक झाले. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
राधिका मर्चंटच्या विदाईचा म्हणजेच पाठवणीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती पती अनंतबरोबर हळूहळू चालत जात आहे. तर, मुकेश अंबानी तिथे बाजूलाच उभे आहेत. त्यानंतर पंडितजी राधिकाला चांदीचा दिवा देतात आणि राधिका त्यांचे आशीर्वाद घेते. यावेळी मुकेश अंबानींना अश्रू अनावर होतात. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळतं आणि ते डोळे पुसताना दिसतात. व्हिडीओमध्ये मुकेश अंबानींना रडताना पाहून या ‘अंबानी अपडेट’ अकाउंटवरून शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकरी भावुक कमेंट्स करत आहेत.
पाहा व्हिडीओ-
‘सूनेच्या पाठवणीत रडणारा सासरा ही खूप अनोखी गोष्ट आहे, कारण बऱ्याच ठिकाणी सासरे सुनेच्या भावनांचाही विचार करत नाहीत,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. ‘एवढी शक्ती आणि पैसा असलेली व्यक्ती कोणालाही काहीही करायला लावू शकते, पण मुकेश अंबानींची नम्रता बघा, ते इतके नम्र आहेत की हात जोडून सगळ्यांना नमस्कार करतात,’ असं आणखी एका युजरने म्हटलं आहे.
‘राधिका खूप नशीबवान आहे की तिला तिच्यावर वडिलांसारखं प्रेम करणारे सासरे मिळाले,’ ‘मुकेश अंबानी जेंटलमन आहेत, ते सूनेला आपल्या मुलीसारखं जपतील,’ असंही काही युजर्सनी म्हटलं आहे.
दरम्यान, अनंत व राधिकाच्या लग्नाचे सर्व सोहळे आता पार पडले आहेत. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ पापाराझी अकाउंटवरून शेअर केले जात आहेत, त्यात या शाही लग्नातील काही खास क्षण चाहत्यांना पाहायला मिळत आहेत.