अभिनेते मुकेश खन्ना त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. मुकेश खन्ना हे सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करत असतात. त्यांनी नुकताच यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये मुकेश खन्नांनी विमलच्या जाहिरातीवरुन बॉलिवूडच्या स्टार्संवर टीका केली आहे. या संबंधित पोस्टर ट्विटरवर शेअर करत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
विमलच्या जाहिरातीवर बोलताना मुकेश खन्ना यांनी अजय देवगनचा फोटो ट्वीट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ते लिहितात की, “जेव्हा एखादी व्यक्ती समोरुन नमस्कार करते किंवा आदाब करते, तेव्हा किती छान वाटतं. पण जर हा आदाब केशरी रंगाचा गैरवापर करुन गुटख्यासारख्या व्यसनाला प्रमोट करत असेल, तर त्या नमस्कार/ आदाबचा राग येतो. अशा वेळी लोकांना मारायची इच्छा होते. बॉलिवूडचे तीन-तीन सुपरस्टार्स ‘बोलो जुबा केसरी..’ म्हणत अशा वाईट गोष्टीच्या प्रचलनासाठी जाहिरात करत आहेत याची चीड येते.”
एकूण प्रकरणावर व्यक्त होताना ‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना यांनी यूट्यूब चॅनलवर आठ मिनिटांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. “जेव्हा समोरुन कोणी नमस्कार किंवा आदाब करत असेल, तर तुम्हाला आनंद होईल. पण तुम्हाला कोणाच्या नमस्कार/ आदाबचा राग आला आहे का ? मला आला आहे. बॉलिवूडचे मोठे सुपरस्टार्स टेलिव्हिजनवर आदाब म्हणत लोकांना व्यसन करायला प्रवृत्त करत असल्याचा राग मला आला आहे. ते केशरी रंगाचा गैरवापर देखील करुन सुपारीच्या नावावर गुटख्याची जाहिरात करत आहेत या गोष्टीने मी संतापलो आहे.” असे म्हणत त्यांनी बॉलिवूडच्या स्टार्संवर धारेवर धरलं आहे.
विमल पान मसाला कंपनीच्या प्रमोशनसाठी अभिनेता अजय देवगन यांने काही जाहिरातींमध्ये काम केले. यावरुन अजयला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले गेले. अजयनंतर शाहरुख खान यानेही या जाहिराती करण्यासाठी होकार दिला. या जाहिरातींमुळे शाहरुखला देखील ट्रोलर्सचा सामना करायला लागला. दरम्यान अभिनेता अक्षय कुमारची एक सकात्मक प्रतिमा तयार झाली होती. सर्वत्र त्याच्या कामाची चर्चा होती. अक्षयने विमल पान मसाल्याची जाहिरात केल्याने त्याला सर्वात जास्त रोष पत्करावा लागला होता. त्याने चाहत्यांची माफी मागत पुढे अशा जाहिरातींमध्ये काम न करण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते.