स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ चित्रपट ७ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. मराठीतील आघाडीची जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे सलग तिसऱ्यांदा दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्याबरोबर एकत्र काम करत आहेत. पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटाचे तीन भाग प्रदर्शित होण्याचा विक्रम मुंबई- पुणे-मुंबईनं केला. ‘केदारनाथ’ या हिंदी चित्रपटाचं आव्हान असतानाही ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’नं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
‘मुंबई-पुणे-मुंबई ३’नं तीन दिवसांत ५ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाचा अभिनेता स्वप्नील जोशी यानं स्वत: या चित्रपटाच्या कमाईची माहिती ट्विटरद्वारे दिली. स्वप्नील- मुक्ताव्यतिरिक्त प्रशांत दामले, सविता प्रभुणे, सुहास जोशी, मंगल केंकरे आणि विजय केंकरे यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.
"मला सांगा..सुख म्हणजे नक्की काय असतं !"
.
.
आपल्या #MPM3 ला #Sup3rhit केल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार…
दिमाखात सुरु आहे…जवळच्या चित्रपटगृहात !!!#mpm3 #weekendvibes #housefull #gratitude #teamwork pic.twitter.com/kvckBzMk4S— पुण्याचा गौतम (@swwapniljoshi) December 10, 2018
“मुंबई पुणे मुंबई’ला इतकं यश मिळेल असे आम्हाला सुरुवातीला वाटलेच नव्हते. असं म्हणत दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. याआधी नागराज मंजुळेचा ‘नाळ’, सुबोध भावेच्या ‘आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ आणि प्रवीण तरडेच्या ‘मुळशी पॅटर्न’नं जोरदार कमाई बॉक्स ऑफिसवर केली होती. ‘नाळ’नं पहिल्याच आठवड्यात १७ कोटींची कमाई केली होती. तर ‘मुळशी पॅटर्न’नंही बॉक्स ऑफिसवर १३ कोटींची कमाई केली आहे.