अभिनेते किरण माने हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून त्यांना काढण्यात आल्यानंतर या चर्चा सुरु झाल्या आहेत. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणी स्टार प्रवाह वाहिनीने सविस्तर निवदेन दिले आहे. दरम्यान हा संपूर्ण प्रकार समजल्यानंतर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील अभिनेत्री अनिता दातेने तिची प्रतिक्रिया मांडली. अनिताने फेसबुकवर एक पोस्ट टाकत या सर्व प्रकरणी तिचे मत व्यक्त केले.
अनिता दाते हिची फेसबुक पोस्ट
“मागिल 4 दिवसापासून किरण माने ह्याला कोणतेही कारण न देता मालिकेतून काढून टाकण्यात आले असे तो सातत्याने विविध माध्यमातून सांगत होता. कलाकाराला त्याला त्याचे काम काढून घेताना ते का काढून घेतले हे विचारतोय तर ते त्याला सांगण्याचे सौजन्य त्या संस्थांनी दाखवले पाहिजे. ही माझी कलाकार म्हणून असलेली अपेक्षा मी मांडली.”
“आज स्टार प्रवाह ह्या वाहिनीने लोकसत्तामध्ये किरण माने ह्याला त्याच्या गैरवर्तणुकीमुळे काढले. त्याला त्या आधी समज दिली होती. हे देखील सांगितले. तसेच ,आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करतो हे स्पष्ट केलं याबद्दल मी कलाकार म्हणून त्याचे मनापासून आभार मानते.”
“आपले विचार नेहमीच योग्य पध्दतीने आपण मांडले पाहिजे. व्यवस्थेला प्रश्न देखील विचारले पाहिजेत. कोणतीही दडपशाही नसावी असेच मला वाटते. कालपासून माझ्या पोस्टवरील comment वाचताना मला अजून काही गोष्टी जाणवल्या. जसे की,
1.सभ्यता फार कमी लोकात असते.
2.शिवी देणे चुकीचे आहे असं म्हणणारा माणूस त्याच वाक्यात शिवी देऊ शकतो.
3.अनेक माणसे सभ्य भाषेत धमकी देतात.
4.कोणी ब्राम्हण विरोधी बोलत असेल तर ब्राम्हण स्त्री ने त्याला सपोर्ट करायचा नसतो. त्या साठी टक्याची भाषा वापरतात.
5.काय चूक काय बरोबर हे शोधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण आपल्या जातीच्याच बाजूने बोलायला हवं.
जात आता आम्ही मानत नाही असं म्हणताना छुप्या पद्धतीने जात मानायची असते. अश्या अनेक गोष्टी ह्या नंतर देखील मला comment मध्ये वाचायला मिळतील. माणूस म्हणून मला समृध्द होण्यासाठी फारच मदत होईल,” असे तिने या पोस्टमध्ये म्हटले.
नेमकं प्रकरण काय?
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मा लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी विलास पाटील हे पात्र साकारलं होतं. अल्पावधीतच हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं. किरण माने हे अनेकदा त्यांच्या भूमिकेबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे सुद्धा चर्चेत असायचे. ग्रामीण भाषेतील लहेजा त्यांच्या लेखणीमधून स्पष्टपणे जाणवतो. अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात. मात्र आता याच राजकीय भूमिकांमुळे ते अडचणी सापडले आहेत. त्यांना राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर #istandwith_KiranMane हा हॅशटॅग चर्चेत आला होता. अनेकांनी किरण मानेंवर झालेली कारवाई ही चुकीची असल्याचं म्हटलंय. मात्र त्याच वेळेस त्यांच्यावर टीकाही केली जाते होती.
दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीने किरण माने प्रकरणी लेखी स्पष्टीकरण दिलं आहे. राजकीय भूमिका मांडत असल्याच्या कारणानं नाही तर अनेक सह-कलाकारांसोबत, विशेषतः महिला कलाकारांसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे. तसेच किरण माने यांनी केलेले आरोप हे अत्यंत चुकीचे आणि बिनबुडाचे असल्याचंही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.