प्रवीण तरडे दिग्दर्शित आगामी ‘मुळशी पॅटर्न’ हा मराठी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील एका गाण्यात चक्क खरे गुन्हेगार झळकल्याने हा वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटातील ‘आरारारा’ हे गाणं प्रदर्शित झालं आणि प्रदर्शनाच्या काही वेळातच सोशल मीडियावर ते हिट ठरलं. मात्र याच गाण्यात कुख्यात गुन्हेगार अमोल शिंदे आणि विठ्ठल शेलार झळकले आहेत.
गाण्याच्या टीझरमध्ये राखाडी रंगाचा शर्ट घातलेला विठ्ठल शेलार दिसत असून त्याच्या पाठोपाठ केशरी शर्टमध्ये अमोल शिंदे दिसत आहे. विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील बोतरवाडी येथील मुळचा राहणारा असून मारणे टोळीसाठी वसुलीची जबाबदारी त्याच्याकडे आहे़. तशी पोलिसांकडे नोंददेखील आहे. त्यातून त्याने मुळशीत दोघांची हत्या केली असून खंडणीसाठी अपहरण करण्याचा गुन्हाही त्याच्या नावावर आहे. शहर पोलिसांनी त्याला एका गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याने मुळशी येथील दुहेरी खुनाची कबुली दिली होती़.
वाचा : बिग बॉसविषयी तिने केले थक्क करणारे १० खुलासे
अमोल शिंदे हासुद्धा गुन्हेगार असून तो वातूनडे गावात सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आला होता़. त्याच्याविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात ३ तर हिंजवडी पोलीस ठाण्यात १ गुन्हा दाखल आहे. पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खून तसेच दरोडा आणि दंगलीचे गुन्हे दाखल आहेत़.
‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट जमिनीचे दर वाढल्याने वर्षानुवर्षे तोट्याची शेती करण्यापेक्षा ती विकून बक्कळ पैसा मिळवण्याचा हव्यास बाळगलेल्या तरुण पिढीवर आधारित आहे. यातील ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ या गाण्याला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता.