आर्यन खान ड्रग्स प्रकरणात एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर आणि त्यांच्या कुटुंबावर विविध आरोप केले आहेत. या गंभीर आरोपांनंतर त्यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे. परंतु, या संपूर्ण प्रकरणात हळूहळू का होईना मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार क्रांतीला पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहेत. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री मेघा धाडे त्यांच्या समर्थनाथ पुठे आली आहे. मेघाने क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांना पाठिंबा दिला आहे. मेघाने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत या प्रकरणात तिची प्रतिक्रिया दिली आहे.
मेघाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत आपलं मत मांडलं आहे. “नमस्कार मी मेघा धाडे. मी आज मनोरंजन विश्वातील कोणतीही माहिती देण्यासाठी आलेली नाही. तर आज मला जाणून घ्यायचं आहे की, आपल्याला नक्की कसा समाज हवा आहे? एक व्यक्ती जिथे तो सत्यासाठी उभा आहे. ती व्यक्ती समाजातील वाईट प्रवृत्तींना संपवण्याचा प्रयत्न करतेय, पण वाईट प्रवृत्ती असलेले काही समाजकंटक त्याच्या मागे लागले आहेत. त्याचा मानसिक छळ करत आहेत. त्याच्या कर्तव्य दक्षतेवर, चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत. अशा समाजात आपण स्वत:ही सुरक्षित नाही. जे न्यायाची, आपली सुरक्षा करतायत, त्यांच्याच वाट्याला एवढी विटंबना येत असेल तर या समाजात सामान्य माणूस कसा जगेल? एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ख्याती आहे. त्यांच्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न खूप संताप आणणारा आहे”, असं ती म्हणाली.
पुढे मेघा म्हणाली, “आता मी त्यांच्या वडिलांचा व्हिडीओ पाहिला. त्यात ते त्यांची जात, धर्म यांचं प्रमाणपत्र दाखवत होते. मला या गोष्टींचा फार संताप येतोय. तुम्ही चोराला सोडून संन्याशाला फाशी देत आहात. जे समाजकंटक हे सगळं करतायत ते कोण आहेत, हे न समजण्याइतके आपण नासमज नाही. जे लोक या सगळ्या वाईट गोष्टींमध्ये आहेत, ते मुद्दाम या माणसाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. जात, धर्म, लग्न, दिवंगत आईचा धर्म या सगळ्या गोष्टी उकरून काढून वानखेडेंना त्रास दिला जातोय. मला सांगा एवढा मोठा अधिकारी फक्त ८ कोटींच्या खंडणीसाठी असं करेल का? खंडणी हा शब्द त्यांच्याशी जोडलं जाणंच चुकीचं आहे. अशा ऑफिसरवर असे आरोप करण्यात येत असतील तर आपल्यासारख्या लोकांनचं काय?”
आणखी वाचा : ५ हजार कोटी रुपयांचा मालक असूनही ‘या’ कारणामुळे मुलांना एक रुपयाही देऊ शकत नाही सैफ
मेघाने शेअर केलेले हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मेघा फक्त समीर यांच्या विषयी बोलली नाही. तर तिने आपल्या अल्पसंख्यांक मंत्री आणि नवाब मलिक यांच्यावर देखील भाष्य केले आहे. याआधी अभिनेता आरोह वेलणकर, विजय आनंद यांनीसुद्धा समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांचे समर्थन केले होते.