वृत्तपट, लघुपट आणि अ‍ॅनिमेशनपटासाठीचा १३वा ‘मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (एमआयएफएफ) पुढीलवर्षी ३ फेब्रुवारीपासून सुरू होतो आहे.
आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन ‘फिल्म डिव्हिजन’ आणि माहिती-प्रसारण मंत्रालयाद्वारे करण्यात येणार आहे.  मुंबईतील ‘एनसीपीए’मध्ये आयोजित होणाऱ्या या महोत्सवाबाबत बोलताना ‘फिल्म डिव्हिजन’चे महासंचालक आणि एमआयएफएफचे संचालक व्ही एस कुंडू म्हणाले, स्वतंत्रपणे वृत्तपट आणि लघुपट तयार करणाऱ्या प्रतिभावंतांच्या हृदयात ‘एमआयएफएफ’ला अतिशय मानाचे स्थान आहे. या क्षेत्रातील प्रतिभावंतांच्या पाठिशी उभे राहण्यासाठी तेराव्या महोत्सवाचे वेगळ्या पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे.
वृत्तपट, लघुपट आणि अ‍ॅनिमेशनपटांसाठीचा अशा प्रकारचा अशियातील हा सर्वांत जुना आणि मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. एमआयएफएफ-२०१४ च्या निमित्ताने चित्रपट निर्मात्यांना आणि चित्रपटप्रेमींना मोठ्या प्रमाणावर मौल्यवान खजिना उपलब्ध होणार आहे.
या वर्षी भारतातील ज्येष्ठ वृत्तपट निर्मात्यास व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.  प्रख्यात वृत्तपट निर्माते पीटर विनटॉनिक यांचे या वर्षी १८ नोव्हेंबर रोजी निधन झाले. या महोत्सवात त्यांना श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे.