गणेशोत्सवाचे दहा दिवस म्हणजे गणरायाच्या भक्तांसाठी खऱ्या अर्थाने आनंदपर्व असते असे म्हणता येईल. वाजतगाजत झालेल्या आगमनापासून ते काहीशा हळव्या मनाने केलेल्या विसर्जनापर्यंत प्रत्येक क्षण हा वर्षभराची ऊर्जा देऊन जातो. एरवी कामाच्या डोंगरखाली दबून गेलेली सगळी नोकरदार मंडळी गणपतीत मनसोक्त आनंद लुटतात, याला आपले सेलिब्रिटीजही अपवाद नाहीत. नुकतंच विलेपार्ले येथील बाल गोपाळ मित्र मंडळाच्या ‘मुंबईचा पेशवा गणपती’ला ‘कलर्स मराठी’च्या ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेतील कलाकारांनी भेट दिली. राजवर्धन म्हणजेच अभिनेता विवेक सांगळे व वैदेही म्हणजेच अभिनेत्री पूर्वा फडके या जोडीने गणपतीच्या आरतीत सहभागी होऊन खऱ्या अर्थाने सोहळय़ाची शान वाढवली. येथील २२ फूट उंच कागदी लगद्याची गणेशमूर्ती पाहून हे दोघेही भारावून गेले होते.
मुंबईच्या पेशव्याची अद्भुत कलाकृती
‘मुंबईचा पेशवा’ हे मंडळ मागील १४ वर्षांपासून आपल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. तब्बल २२ फूट उंच गणेशाची मूर्ती प्रथमदर्शनी प्लास्टर ऑफ पॅरिसनेच बनवली आहे असे भासते, पण वास्तविक ही गणरायाची देखणी कलाकृती केळीचे खांब व टिश्यू पेपरच्या लगद्याचे मिश्रण करून साकारलेली आहे. मंडळाचे अध्यक्ष सुनील मयेकर यांचे वडील दिगंबर मयेकर व भाऊ राजेश मयेकर यांनी ही मूर्ती तीन महिन्यांत बनवली आहे. याबाबत माहिती मिळताच पाहुणे कलाकार विवेक व वैदेही अक्षरश: थक्क झाले होते. मूर्तीइतकाच कल्पक देखावासुद्धा मंडळाने साकारला आहे, कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण जिवंत आहात का?, या आशयाचे चलचित्र पाहून सर्वचजण भारावून गेले होते.
मंडळाचा स्वयंसेवक ते प्रमुख पाहुणा..
विवेक सांगळेने यावेळी ‘लोकसत्ता’शी गप्पा मारताना गणपतीच्या खास आठवणी सांगितल्या. मूळचा लालबागकर असल्याने गणपतीचा जल्लोष फार जवळून पाहिला आहे, मी ‘अभ्युदनगरचा राजा’ गणेश मंडळात आधी स्वयंसेवक म्हणून रांगेत माणसांना मंडपात सोडण्याचे काम करत होतो. आणि आज गणपतीच्याच आशीर्वादाने मालिकेतून घरोघरी पोहचलो आहे, असे विवेकने सांगितले. लहानपणी लालबागच्या सर्व गणेश मंडळांच्या मूर्ती बनत असताना जवळून पाहिल्या आहेत, असे सांगताना विवेकने लहानपणापासून सर्व गणपतीचे छोटे फोटो जपून ठेवण्याच्या आपल्या छंदाचीही माहिती दिली.
मुंबईच्या गणरायाचं भारी कौतुक
‘भाग्य दिले तू मला’ मालिकेतील वैदही म्हणजेच पूर्वा फडके हिनेदेखील आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत घरच्या गणपतीसाठी शेवटच्या दिवशीपर्यंत जागून सजावट करण्याचे अनुभव सांगितले. कुटुंबासोबत रात्रभर जागून गणपतीसाठी मखर तयार करायचे, दीड दिवस आरती, मोदक अशी सगळी धम्माल करून मग विसर्जन झाले की दुसऱ्या दिवशी लालबाग, परळचे गणपती बघायला जायचे असा दरवर्षीचा शिरस्ता होता, असे तिने सांगितले.
मोदकांची हौस सेटवर भागते
अलीकडेच ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत गणपतीचे आगमन झाले होते, यावेळी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सर्व सामान आणून सेटवरील सर्वासाठी मोदक बनवले होते. हेच मोदक खात असतानाचे दृश्य चित्रित करताना राजवर्धन म्हणजेच विवेकची चांगलीच दमछाक झाली होती. वेगवेगळय़ा पद्धतीने पूर्ण आठ मोदक खाऊन आपली मोदकांची हौस भागल्याची मजेशीर आठवण यावेळी विवेकने सांगितली.दरम्यान, ‘लोकसत्ता गणेशमूर्ती स्पर्धे’अंतर्गत कलाकारांच्या हस्ते गणपतीची आरती करण्याची संधी मिळाल्याने ‘मुंबईचा पेशवा मंडळा’च्या परिसरातील चाहत्यांना अत्यंत आनंद झाला होता. विशेषत: महिलांनी आरतीनंतर लाडक्या कलाकारांसह फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
मुख्य प्रायोजक :
महाराष्ट्र औद्योगिक
विकास महामंडळ
सहप्रायोजक :
कलर्स मराठी
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
रुणवाल ग्रुप
पी. सी. चंद्रा ज्वेलर्स
माचो हिंट
पॉवर्ड बाय:
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.
महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि.
पितांबरी दीप शक्ती
बँकिंग पार्टनर :
ठाणे भारत सहकारी बँक लि.