अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी आत्महत्या केली. त्यानंतर त्याची अत्यंत जवळची मानली जाणारी मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची पोलिसांनी आज पुन्हा चौकशी केली. कालही तिला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. आज पोलिसांनी यशराज फिल्म्स आणि इतर दोन प्रॉडक्शन हाऊस यांच्यात आणि सुशांतमध्ये काय कॉन्ट्रॅक्ट झालं होतं त्याची प्रत मागवली आहे. एवढंच नाही तर सुशांतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी आणि त्याचं पीआर पाहणारी राधिका निहालनी यांनाही पोलिसांनी प्रश्न विचारले. मला सुशांतने यशराज फिल्म्स सोडायला सांगितलं होतं असं रियाने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं.
तर सुशांतला छिछोरेच्या प्रमोशनसाठी श्रुती मोदीने बरीच मदत केली होती. तिच्या म्हणण्यानुसार, “सुशांत एक वेगळ्या स्वभावाचा माणूस होता. ड्रीम १५०, नेशन इंडिया या प्रोजेक्टवर तो काम करत होता. तर Vivid Rang या नावाने सुशांतला त्याची व्हर्चुअल गेमची कंपनीही सुरु करायची होती. तर सामाजिक सेवेचा भाग म्हणून तो नेशन इंडिया नावाचा प्रोजेक्ट सुरु करणार होता. त्याच्या कंपनीची नोंदणी झाली होती की नाही याबाबत आपल्याकडे ठोस माहिती नाही” असंही श्रुतीने पोलिसांना सांगितलं.
सुशांत सिंह राजपूतच्या घरात एक खास टेलिस्कोप आहे. त्याच्या घरातून त्याला ग्रह आणि तारे पाहण्यास आवडत असत त्यामुळे त्याने तो तिथे लावला होता अशीही माहिती पोलिसांनी दिली. तसंच सुशांतची आर्थिक स्थितीही अत्यंत व्यवस्थित होती असंही पोलिसांनी सांगितलं. त्याचा महिन्याचा खर्च १० लाखांच्या आसपास होता. तर वांद्रे येथील घराचे भाडे म्हणून सुशांतने साडेचार लाख रुपये भरले होते असंही पोलिसांनी सांगितलं. एका इंग्रजी वेबसाइटने हे वृत्त दिले आहे.
सुशांतने लोणावळ्यातील पवना डॅम भागात एक फार्महाऊसही विकत घेतले होते. त्याची किंमतही लाखोंच्या घरात होती. सुशांत सिंह राजपूतकडे एकाहून एक लक्झरी कारही होत्या. मात्र १४ जूनला त्याने जे पाऊल उचललं त्यामुळे सगळी हिंदी सिनेसृष्टी हादरुन गेली. आत्तापर्यंत १३ लोकांचे जबाब आम्ही नोंदवून घेतल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. व्यावसायिक स्पर्धा, घराणेशाही या मुद्द्यांमुळेच सुशांतला नैराश्य आले होते का? ज्यातून त्याने हे पाऊल उचलले याचाही तपास पोलीस करत आहेत.
सुशांत सिंह राजपूत हा मूळचा छोट्या पडद्यावरचा कलाकार होता. त्याची पवित्र रिश्ता ही सीरियल गाजली. त्यानंतर त्याला काय पो छे हा सिनेमा मिळाला. या सिनेमानंतर सुशांतचं करिअर भरात होतं. शुद्ध देसी रोमान्स, एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी, सोनचिरीया, केदारनाथ, छिछोरे असे वेगळ्या धाटणीचे सिनेमा त्याने दिले. मात्र १४ जून रोजी त्याने जे पाऊल उचलले त्यामुळे सगळी इंडस्ट्री हादरली आहे.