आपल्या अदाकारीने सिने रसिकांना भुरळ घालणारी अभिनेत्री राणी मुखर्जी सोमवारी अचानक मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे अन्वेषण विभागात अवतरली आणि उलटसुलट चर्चा सुरू झाली. मात्र आगामी चित्रपटातील भूमिकेच्या निमित्ताने पोलिसांची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागात ती आल्याचे समजताच चर्चेला पूर्णविराम मिळाला.
यश राज फिल्म्सच्या आगामी ‘मर्दानी’ चित्रपटात राणी मुखर्जी कर्तबगार पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकारी कशा पद्धतीने काम करतात, आणीबाणीच्या वेळी काय करतात, गुंडांशी दोन हात करण्यासाठी कोणती तयारी करावी लागते, पोलिसांची जीवनशैली आदींबाबत राणीला प्रश्न पडले होते. पोलिसांची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी राणीने सोमवारी दक्षिण मुंबईमधील पोलीस मुख्यालयातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात सहाआयुक्त (गुन्हे) हिमान्शु रॉय यांची भेट घेतली. तब्बल तासभर हिमान्शु रॉय यांच्याशी चर्चा करुन पोलिसांची कार्यपद्धत तिने समजून घेतली.
हिमान्शु रॉय यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर राणी पोलीस मुख्यालयातून बाहेर पडली. मात्र तिने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलण्यास स्पष्ट नकार दिला.
राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेला ‘मर्दानी’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रदीप सरकार करीत आहेत.

Story img Loader