शास्त्रीय संगीताचा बाज, गाजलेल्या संगीत नाटकावर आधारित त्याच तोडीचा चित्रपट म्हणून नावाजलेला सुबोध भावे दिग्दर्शित ‘कटय़ार काळजात घुसली’ आणि ‘मुंबई पुणे मुंबई २’ची यशस्वी कथा पुढे घेऊन जाणारा सतीश राजवाडे दिग्दर्शित सिक्वलपट ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले. पहिल्या आठवडय़ाच्या अखेरीस हे दोन्ही चित्रपट सात कोटी रुपयांच्या घरात पोहोचले असून दोन्ही चित्रपटांनी जवळपास सारखीच कमाई केल्याचे चित्र दिसते आहे. दोन चांगले मराठी चित्रपट एकत्र प्रदर्शित झाल्याचा परिणाम तिकीटबारीवर दिसून येतो आहे.
‘मुंबई पुणे मुंबई २’ या चित्रपटासाठी लोकांची मागणी वाढल्याने गेल्या आठवडय़ात शोजची संख्या ५८७ होती ती ६८० पर्यंत वाढवण्यात आली असून आता कतार, दुबई, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि लंडन येथेही चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती चित्रपटाच्या सूत्रांनी दिली.
‘कटय़ार काळजात घुसली’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी शास्त्रीय संगीतावर आधारित असलेला हा चित्रपट एका ठरावीक प्रेक्षकवर्गापुरता मर्यादित राहील, अशी शंका आम्हाला होती. मात्र ठाणे-वसई-विरारपासून ते पिंपरी-चिंचवडसारख्या भागांतही चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळाल्याची माहिती साने यांनी दिली. राज्याबाहेर भोपाळ, इंदूर, हैद्राबाद, बंगळुरू सगळीकडे दिवसाला तीन शोज दाखवले जात असून तिथेही चित्रपट ‘हाऊसफुल्ल’ असल्याचे सांगतानाच परदेशात सॅन फ्रान्सिस्को, डल्लास, न्यू जर्सी इथेही शोज हाऊसफुल्ल झाले आहेत, असे साने यांनी सांगितले. ‘मुंबई पुणे मुंबई २’ हा चित्रपट सहा ते सात कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्या आठवडय़ाच्या अखेरीस चित्रपटाचा निर्मितीखर्च वसूल झाला आहे, तर ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटावर निर्मितीबरोबरच प्रसिद्धीसाठीही अमाप खर्च केला असल्याने चित्रपटाचे बजेट आठ कोटींच्या घरात पोहोचले. याही चित्रपटाचा निर्मितीखर्च जवळपास वसूल होत आला असला तरीही नफ्याचे गणित साधण्यासाठी या दोन्ही चित्रपटांची भिस्त दुसऱ्या आठवडय़ाच्या तिकीट विक्रीवर आहे. दिवाळीच्या सुटय़ा असल्या तरी दोन मोठे चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाल्याने चित्रपटांचा प्रेक्षक विभागला असून परिणामी त्याचा मोठा फटका तिकीटबारीवर या दोन्ही चित्रपटांना बसला आहे. तरीही अजून दोन आठवडे हातात असल्याने चित्रपटांचे नफ्याचे गणित साधले जाईल, असा विश्वास दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी व्यक्त केला .
‘मिराह एण्टरटेन्मेट’ आणि ‘एव्हरेस्ट एण्टरटेन्मेट’ची संयुक्त निर्मिती असलेला ‘मुंबई पुणे मुंबई २’ या चित्रपटाने सात दिवसांत सात कोटी रुपयांची कमाई केली असून येत्या आठवडय़ाभरात हा आकडा दहा कोटींपर्यंत पोहोचेल
संजय छाब्रिया, निर्माता
‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटाने पहिल्या आठवडय़ाच्या अखेरीस सात कोटींच्या वर कमाई केली आहे. मुंबई, ठाणे-वसई-विरारपासून ते पिंपरी-चिंचवडसारख्या भागांतही चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळाला
निखिल साने -‘झी स्टुडिओ’ व्यवसायप्रमुख