जवळपास आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई- पुणे- मुंबई’ या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट निर्माते संजय छाब्रिया आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या हिट जोडीचा ‘मुंबई पुणे मुंबई’चा तिसरा भाग ७ डिसेंबर २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
‘मुंबई पुणे मुंबई-२’ हा दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा, गुजरात, कर्नाटक आणि अगदी अमेरिका, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमधील चित्रपट रसिकांनीही या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.
”मुंबई- पुणे- मुंबई’ हा आता एक वेगळा ट्रेण्ड झाला असून प्रेमकथेचा अनोखा धडा त्यातून गिरवला गेला आहे. गौतम आणि गौरीच्या आयुष्यात आता पुढे काय घडणार याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे. येणाऱ्या चित्रपटाच्या कथेबद्दल मी फार काही सांगणार नाही, पण एक गोष्ट नक्की सांगू शकतो की हा तिसरा भागही तेवढाच यशस्वी ठरणार आहे,’ असं सतीश राजवाडे म्हणाले.
Khatron Ke Khiladi 9: स्टंटदरम्यान आदित्य नारायण आणि विकास गुप्ताला दुखापत
‘मुंबई पुणे मुंबई’ या आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला मोठे यश मिळाले आणि त्यातून त्याच्या दुसऱ्या भागाची निर्मिती झाली. त्याशिवाय पहिल्या भागाची अनेक भाषांमध्ये पुनर्निर्मिती झाली. या चित्रपटाची वाहवा संपूर्ण जगातील सिनेरसिकांकडून झाली. स्वप्नील आणि मुक्ता ही जोडी रसिकांना खूपच भावली होती. दोन्ही चित्रपटांना सिनेरसिकांकडून फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला होता. ही बाब बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने केलेल्या व्यवसायातूनही स्पष्ट झाली होती. ‘मुंबई पुणे मुंबई-३’ची कथा पल्लवी राजवाडे यांनी लिहिली आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद अश्विनी शेंडे आणि पल्लवी राजवाडे यांनी लिहिले आहेत.