‘अ‍ॅमेझॉन प्राईम’वरील ‘मुंबई सागा’ या चित्रपटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खोडसाळ तसेच मानहानीकारक चित्रण व संवाद ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ (सेन्सॉर) कडून चित्रपट निर्मात्यांच्या सांगण्यावरून अस्पष्ट (ब्लर) करण्यात आले आहे. या सिनेमाची निर्मिती केलेल्या सुपर कॅसेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, व्हाईट फेदर लिमिटेडने आपली चूक मान्य करून चित्रपटातील ‘ते’ दृश्य सेन्सॉरकडून आणि ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ब्लर केलं आहे. असं असलं तरीही त्यांनी अजून जाहीर माफी मागितलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावरील खटला आपण मागे घेणार नसल्याचे, वकील प्रकाश साळसिंगीकर यांनी स्पष्ट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> फाटकी जीन्स प्रकरण : RSS च्या नेत्यांचा हाफ चड्डीमधील फोटो पोस्ट करत प्रियंका गांधी म्हणाल्या, “अरे देवा…”

‘मुंबई सागा’ या चित्रपटातील अभिनेत्यांच्या तोंडी असलेल्या संवादात भाऊच्या संघटनेचा उल्लेख आहे. या भाऊच्या संघटनेतील सदस्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात स्पष्टपणे दाखवण्यात आलेले. भाऊची सेना या नावाने असलेल्या संघटनेत संघाच्या गणवेशात, हातात दंड घेऊन शाखेत ज्याप्रमाणे ध्वजाला प्रणाम करतो तशाचप्रकारे प्रणाम करणारे स्वयंसेवक दाखवले होते. अनेक स्वयंसेवक पोलीस खात्यात जातात आणि नंतर भ्रष्टाचार करतात, असेही या चित्रपटातील संवादाद्वारे म्हटले होते. तसेच हा चित्रपट सत्यघटनेतून प्रेरित असल्याचे सुरुवातीलाच सांगितले आहे.

नक्की वाचा >> अयोध्या जमीन खरेदी प्रकरण : “भाजपा, RSS आणि केंद्र सरकारने खुलासा करावा”

या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या प्रसंगामुळे संघ स्वयंसेवकांची मानहानी होत असून यामुळे संघ व स्वयंसेवकांबाबत चुकीचा संदेश समाजात जात असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबईतील स्वयंसेवक महेश भिंगार्डे यांनी संघाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक व निर्माते यांना कायदेशीर नोटीस पाठविली होती. चित्रपटातील संबंधित प्रसंग, संवाद त्या चित्रपटातून काढून टाकावेत व बिनशर्त माफीही मागितली जावी, अशी मागणीही त्यांनी या नोटिशीत केली होती. महेश भिंगार्डे यांच्यावतीने वकील प्रकाश साळसिंगीकर यांनी ही नोटीस बजावली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai saga rss related scene blurred scsg