‘बेबी’ आणि ‘सॉरी’ यांसारखी सुपरहिट गाणी देणारा विदेशी गायक जस्टिन बीबर मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच जस्टिनला रामसे हंट सिंड्रोम हा आजार झाला असल्याची माहिती समोर आली होती. जस्टिननं स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत याची माहिती दिली होती. ज्यानंतर त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. सर्वजण तो लवकर ठीक व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. पण मुनव्वर फारूखीनं मात्र त्याच्या आजाराची खिल्ली उडवली आहे. ज्यामुळे भडकलेल्या चाहत्यांनी मुनव्वरला चांगलंच फैलावर घेतलं आहे.
जेव्हा जस्टिन बीबरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा त्याच्या भारतीय चाहत्यांनाही धक्का बसला होता. अनेकांना त्याची चिंता वाटतेय, पण ‘लॉक अप’ विजेता मुनव्वर फारूखीनं मात्र आजारामुळे जस्टिनच्या बिघडलेल्या चेहऱ्याची खिल्ली उडवली आहे. मुनव्वरनं जस्टिनला उद्देशून एक ट्वीट केलं आहे. ज्यात त्यानं लिहिलं, ‘प्रिय जस्टिन बीबर, मी तुझी अवस्था समजू शकतो. एवढंच नाही तर भारतातही उजवी बाजू व्यवस्थित काम करत नाहीये.’ आपल्या या ट्वीटचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवरही शेअर केला आहे.
आणखी वाचा- Y trailer: महिन्यातील शेवटचा शुक्रवार आणि धक्कादायक घटनांचं वास्तव, ‘वाय’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित!

मुनव्वरच्या या पोस्टनंतर जस्टिनच्या चाहत्यांनी त्याला चांगलंच सुनावलं आहे. मुनव्वरच्या या जोकवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जस्टिनच्या आजाराची अशाप्रकारे खिल्ली उडवणं चाहत्यांना अजिबात आवडलेलं नाही. एका युजरनं मुनव्वरच्या पोस्टवर कमेंट करताना लिहिलं, ‘कोणाच्याही आजाराबद्दल असं बोलण्याआधी तू किती क्रुर आहेस हे पाहा, हे अजिबात विनोदी नाही.’ दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘मी तुझा चाहता आहे पण अशाप्रकारे आपल्या कॉमेडीसाठी दुसऱ्याचा दुःखाचा असा वापर करणं अजिबात योग्य नाही. तू क्रिएटिव्ह कंटेन्ट तयार कर ज्याच्यासाठी तू ओळखला जातोस आणि आम्हाला माहीत आहे की तू करू शकतोस.’ आणखी एका युजरनं लिहिलं, ‘कोणाच्याही वेदनांचा असा विनोद करणं विनोदी नाही. मी तुझा फॅन होतो पण या सर्व गोष्टी पाहून मला वाटतं की तू गर्विष्ठ झाला आहेस.’

आणखी वाचा- “मी तिच्यावर लाखो रुपये…” राखी सावंतच्या आरोपांवर पूर्वश्रमीचा पती रितेश भडकला
दरम्यान जस्टिन बीबरने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात त्याच्या आजाराविषयी सांगितलं होतं. या आजारामुळे त्याचा उजव्या बाजूचा कान आणि चेहरा बिघडला आहे. एवढंच नाही तर त्याचा उजव्या डोळ्याची उघडझाप होत नाहीये. जस्टिननं सांगितलं की हा एक दुर्मिळ आजार आहे. आतापर्यंत हा आजार झालेल्या लोकांची संख्या फार कमी आहे. डॉक्टरांच्या मते जर असा आजार झालेल्या लोकांवर वेळेवर उपचार झाले तर हे रुग्ण ७५ टक्के पूर्णपणे ठीक होऊ शकतात.