कंगना रणौतचा रिअलिटी शो ‘लॉक अप’ सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहे. विशेषतः या शोमध्ये मुनव्वर फारूखी सर्वात लोकप्रिय सदस्य मानला जात आहे. या आठवड्यातील एका व्हिडीओमध्ये मुनव्वर आणि जीशान खान एकमेकांसोबत गुपित शेअर करताना दिसत आहेत. रविवारच्या एपिसोडमध्ये कंगनानं सर्वच स्पर्धकांना आपलं गुपित शेअर करण्यास सांगते. त्यावेळी सर्वात आधी अली मर्चंटनं स्वतःचं गुपित सांगितलं. त्यानं सांगितलं की, २०१६ मध्ये त्याचं अरेंज मॅरेज झालं होतं. मात्र त्याचा २०२१ मध्ये घटस्फोटही झाला.

मुनव्वर फारूखीनंही यावेळी स्वतःचं गुपित शेअर केलं. हे गुपित सांगताना मुनव्वर त्याच्या आईच्या निधनाबाबत धक्कादायक खुलासा केला. मुनव्वर म्हणाला, ‘ही जानेवारी २००७ ची गोष्ट आहे. जेव्हा मला माझ्या आजीनं सकाळी ७ वाजता उठवलं आणि सांगितलं की माझ्या आईला काहीतरी झालंय आणि ती रुग्णालयात आहे. जेव्हा तिला अतिदक्षता विभागातून बाहेर आणलं गेलं तेव्हा ती सतत ओरडत होती. तिचा एक हात पोटावर होचा आणि एक हात मी पकडला होता.’

मुनव्वर पुढे सांगतो, ‘माझं संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी होतं पण आईसोबत काय झालंय हे त्यावेळी मला कोणीही सांगितलं नाही. नंतर जेव्हा तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं, त्यावेळी माझ्या आजीनं मला सांगितलं की आईनं अॅसिड प्यायलं होतं. जेव्हा मी विचारलं की हे सर्व डॉक्टर्सना का नाही सांगितलं? तर ती म्हणाली की त्यामुळे समस्या होऊ शकते. जेव्हा मी माझ्या नर्स असलेल्या बहिणीला ही गोष्टी सांगितली तेव्हा तिलाही या गोष्टीचा धक्का बसला. त्यानंतर आईवर उपचार सुरू करण्यात आले.’

आपलं गुपित शेअर करताना मुनव्वर म्हणाला, ‘मला आठवतंय तो दिवस शुक्रवार होता. दुपारची वेळ होती आणि डॉक्टरांनी मला सांगितलं की, आईचा हात सोडून दे. त्यांनी बळजबरीनं माझा हात तिच्या हातातून सोडवला तेव्हा मला जाणवलं की, माझ्या आईचं निधन झालं होतं. त्यानंतर बरेचदा, जर मी त्या रात्री आईसोबत असतो तर किंवा थोडं अगोदर हॉस्पिटलला पोहोचलो असतो तर असे विचार माझ्या मनात आले. डॉक्टरांनी त्यावेळी सांगितलं की तिने तब्बल ८ दिवस काहीच खाल्लं नव्हतं. २२ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात माझी आई कधीच आनंदी नव्हती. मी माझ्या आयुष्यात अनेकदा तिला मारहाण होताना पाहिली. माझे आई- वडील नेहमीच भांडत असलेले मी पाहिलेत.’

Story img Loader