प्रचंड उत्साहात आणि झगमगाटात संपन्न झालेल्या ‘मर्डर मेस्त्री’ या मराठी चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्यात शब्द-सुरांची अनोखी मैफल सजली. कलाकारांच्या रंगतदार लाइव्ह परफॉर्मन्सने या सोहळ्यात चांगलेच रंग भरले. क्रांती रेडकर आणि संजय खापरे यांच्या धमाकेदार स्कीटने चांगलीच धमाल उडवली तर आरोही आणि आदर्श शिंदे यांच्या स्वरांनी सगळ्यांनाच चिंब भिजवून टाकले. या सगळ्यावर कळस चढवला मानसी नाईकच्या दिलखेचक अदांनी. विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ‘मर्डर मेस्त्री’ चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न झाला
अलिकडे मराठी सिनेसंगीताचा दबदबा वाढताना दिसतोय. गाण्याचे सादरीकरण हटके करण्याकडे संगीतकारांचा ओढा असतो. संगीताकडे नव्या दृष्टीने पाहणारी नवी फळी मराठी सिनेसंगीतात सक्रीय होताना दिसते आहे. आगामी बहुचर्चित ‘मर्डर मेस्त्री’ या सिनेमातही सुमधुर गीतांचा हा नजराणा अनुभवता येणार आहे. ‘मर्डर मेस्त्री’ चित्रपटात एकूण ३ गीते आहेत. गीतकार गुरु ठाकूर व मंदार चोळकर यांच्या शब्दांनी यातील गीते सजली आहेत. ‘संशयाचा किडा’, ‘जीवाला लागला घोर’ ही दोन गीते गायक आदर्श शिंदे यांनी स्वरबद्ध केली आहेत. रसिकांच्या मनावर आपल्या सुरेल स्वरांची मोहिनी घालणाऱ्या आशातांईचे ‘अळीमिळी गुपचिळी चिडीचूप’ हे एक भन्नाट गीत या चित्रपटात आहे. नव्या दमाचे संगीतकार पंकज पडघन यांचा संगीतसाज या चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. सुंदर कथेच्या कॅनव्हासवर ‘मर्डर मेस्त्री’ सिनेमातील गीतांनी सुरेख रंग भरण्याचा प्रयत्न केल्याची भावना गायक संगीतकारांनी व्यक्त केली.
नाडियादवाला आणि वैभव भोर निर्मित या चित्रपटात एखादया छोट्याशा सवयीनेसुद्धा माणसाचं आयुष्य कसं बदलू शकतं हे दाखवण्यात आलं आहे. आपल्या कॅमेऱ्याच्या जादूने अनेक चित्रपटांना नेत्रसुखद करणाऱ्या राहुल जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन व छायांकन केलं आहे.दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, हृषिकेश जोशी, विकास कदम, संजय खापरे, क्रांती रेडकर, मानसी नाईक, कमलाकर सातपुते अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. ‘मर्डर मेस्त्री’ मधल्या रहस्याचा गुंता १० जुलैला आपल्यासमोर उलगडणार आहे.
‘मर्डर मेस्त्री’ संगीत सोहळा
प्रचंड उत्साहात आणि झगमगाटात संपन्न झालेल्या 'मर्डर मेस्त्री' या मराठी चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्यात शब्द-सुरांची अनोखी मैफल सजली.
First published on: 26-06-2015 at 03:38 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder mestri music launch