ल्युमिएर ब्रदर्सनी १८९६ मध्ये मुंबईत पहिल्यांदा हलती चित्रे दाखवली ती आपल्यासाठी सिनेमाची पहिली तोंडओळख. त्यानंतर भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांनी आपल्याला पहिल्यांदा या सिनेमा नावाच्या तंत्राची ओळख करून दिली तेव्हापासून आत्तापर्यंत या सिनेमासृष्टीने अनेक युगांतून स्थित्यंतर केले आहे. मूकपट, मग बोलपट आणि आताचे तंत्रावर कमालीची हुकूमत असणारे चित्रपट असा सगळा इतिहास दक्षिण मुंबईतील ‘गुलशन महल’मध्ये जिवंत झाला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीने दुसऱ्या शतकात दमदार प्रवेश केला आहे. त्यामुळे इतक्या वर्षांत इथे रुजताना सिनेमातील स्थित्यंतराचा हा प्रवास संग्रहित व्हावा या हेतूने भारतीय चित्रपटसृष्टीच्या संग्रहालयाची उभारणी करण्यात आली असून पुढच्या महिन्यात त्याचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी केली.
भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास संग्रहित करण्यासाठी पेडर रोडवरील ‘गुलशन महल’ या पुरातन वास्तूची निवड करण्यात आली असून तब्बल ६ हजार चौरस फूट परिसरातील या वास्तूत भारतीय सिनेमाचे बदलत गेलेले तंत्र, त्यांचे सामाजिक पडसाद अशा अनेक गोष्टी पोस्टर्स, जुनी गाणी, जुन्या छायाचित्रफितींच्या माध्यमातून या संग्रहालयात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ‘गुलशन महल’ या वास्तूत प्रवेश केल्यापासून दोन्ही बाजूंना पाहताना ‘सिनेमा’ नावाच्या अद्भुत विश्वात पाहणारा हरवून जावा, अशा पद्धतीने याची मांडणी करण्यात आली असल्याचे तिवारी यांनी सांगितले. आर. के. स्टुडिओ, मेहबूब स्टुडिओ, प्रसाद स्टुडिओ अशा नामांकित स्टुडिओंनी या संग्रहालयासाठी जुनी साधने, फिल्म प्रॉपर्टीज उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय, १९४१ साली स्थापन झालेल्या फिल्म्स डिव्हिजननेही जुने कॅ मेरे, ध्वनिमुद्रणाची साधने इथे संग्रहित केली आहेत. २० व्या ‘लाइफ ओके स्क्रीन वार्षिक पुरस्कार सोहळ्यात’ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मनीष तिवारी यांनी चित्रपटसृष्टीच्या शतकपूर्तीनिमित्त भारतीय सिनेमाच्या या संग्रहालयाबरोबरच जुन्या चित्रपटांच्या फिल्म्स पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशाने ‘नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन’ही हाती घेण्यात आले असल्याचे सांगितले. ६०० कोटींच्या या प्रकल्पामध्ये जुने चित्रपट डिजिटल स्वरूपात रूपांतरित करून त्यांचे स्वतंत्र संग्रहालय उभारण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा