आपल्या चित्रपटांमध्ये संगीताला महत्त्वाचं स्थान आहे, गाण्याबिण्यांशिवाय चित्रपट पुरा होऊ  शकत नाही, पण असं असलं, तरी आपले चित्रपट हे हॉलीवूडमधल्या म्युझिकल्स, सांगीतिकेच्या परंपरेत मोडत नाहीत. म्युझिकल्समध्ये गाणी ही प्रसंगांची, संवादांची जागा घेतात आणि कथानकाला पुढे नेण्याचं काम करतात. आपले हिंदी-मराठी चित्रपट गाणी ही कथानकाचा धागा तोडून वापरतात, एक स्वतंत्र विरंगुळा असल्यासारखे. सध्या चित्रगृहांत ठाण मांडलेला आणि बहुधा यंदाचा ऑस्कर गाजवणारा ‘ला ला लॅन्ड’ आजची आदर्श म्युझिकल्स कशी असावी याचं एक उत्तम उदाहरण मानता येईल.

‘ला ला लॅन्ड’मधल्या कथानकातला ‘हॉलीवूड’ या स्थळाचा आणि व्यवसायाचा संदर्भ हा आपल्याला ‘सिंगिंग इन द रेन’ (१९५२) किंवा ‘द आर्टिस्ट’ (२०११)  यासारख्या अमेरिकन चित्रपट उद्योगाची पाश्र्वभूमी वापरणाऱ्या सिनेमांची आठवण करून देण्याची शक्यता आहे. ‘सिंगिंग इन द रेन’ची अधिक, कारण तोही चित्रपट म्युझिकलच आहे. म्युझिकल्सचा जमाना आता पूर्वीसारखा उरलेला नाही. नाही म्हणायला ‘मुला रुज’ (२००१), ‘शिकागो’ (२००२) यासारख्या चित्रपटांतून हा चित्रप्रकार अधेमधे डोकावतो. २०१६ सालात ‘सिंग स्ट्रीट’ आणि ‘पॉप स्टार : नेव्हर स्टॉप नेव्हर स्टॉपिंग’ नामक दोन खूपच चांगले संगीत चित्रपट आले होते. पण  ‘ला ला लॅन्ड’ ही आजची सांगीतिका त्यांहून वरचढ आहे.

Sarangi maestro Pt Ram Narayan passes away
व्यक्तिवेध : पं. रामनारायण
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
hemal ingle bridal to be party
Video : ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, मैत्रिणींसह केली Bride To Be पार्टी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
neetu kapoor ridhhima kapoor sahni dance on jamal kadu
Video : आई अन् लेकीचा ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स, रिद्धिमा कपूर साहनीबरोबर नीतू कपूर यांनी धरला ठेका; पाहा व्हिडीओ
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’

या चित्रपटाचा दिग्दर्शक डेमिअन चेजेलला संगीतात प्रचंड रस आहे. त्याच्या आधीच्या ‘व्हिपलॅश’ या चित्रपटात ते प्रकर्षांने दिसले होते. पण ती सांगीतिका नव्हती. इथे मात्र त्याने सांगीतिका तर केलीच आहे, वर हॉलीवूडच्या सुवर्णकाळातल्या सांगीतिकांची आठवण करून देणारी शैली निवडली आहे. त्या पद्धतीचे नाच, दृश्य रचना, वरवरचं छायाचित्रणाचं स्वरूप याचा वापर जाणवण्यासारखा आहे. तरीही हा चित्रपट आजचा ठरतो तो त्यातल्या पात्रांमार्फत व्यक्त होणाऱ्या दृष्टिकोनामुळे आणि पटकथेच्या रचनेतला आशय आणि क्लृप्त्यांमुळे.

कथानक म्हणून ‘ला ला लॅन्ड’मध्ये नवं असं काही नाही. पारंपरिक वळणाची प्रेमकथाच त्यात मांडलेली आहे. सेबॅस्टीअन ( रायन गॉसलिंग) आणि मिआ ( एमा स्टोन ) यांची एका ट्रॅफिक जॅममध्ये अचानक गाठ पडते आणि पुढले काही दिवस ते असेच भेटत राहातात. त्याला संगीतात रस असतो आणि आपला जॅझ क्लब सुरू करायचं त्याचं स्वप्न असतं. तिला हॉलीवूडमधली मोठी अभिनेत्री बनायचं असतं. आधीच्या थोडय़ा कुरबुरीनंतर दोघांचा मैत्री, मग प्रेम असा प्रवास होतो. दरम्यान सेबॅस्टीअनला एका बॅन्डबरोबर काम करून पैसा, लोकप्रियता मिळते आणि कदाचित तो आपलं स्वप्न बाजूला ठेवून वेगळंच काही करेलशी शक्यता दिसायला लागते. मिआचंही कुठे काही जमताना दिसत नाही. अशा अस्वस्थ वातावरणात दोघांच्या नात्यातही अंतर पडायला लागतं.

आपण आयुष्याकडून ज्या अपेक्षा ठेवतो आणि पुढे ज्या तडजोडी आपल्याला कराव्या लागतात त्याविषयीचा विचार ‘ला ला लॅन्ड’च्या केंद्रस्थानी आहे. यश म्हणजे काय? आपल्याला न पटणाऱ्या विषयात मिळालेला पैसा किंवा प्रसिद्धी याची आपल्या लेखी किंमत काय? आपल्या स्वप्नापर्यंत पोचण्यासाठी किती मोठा त्याग करायची आपली तयारी आहे ? असे अनेक प्रश्न ‘ला ला लॅन्ड’ला पडतात. या प्रश्नांच्या शोधातली पात्रं कधी हेकेखोरही वाटू शकतील, पण त्यांचं तसं असणं हा चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे.

अभिनय, संगीत आणि दृश्य परिमाण, या ला ला लॅन्डच्या सर्वात जमेच्या बाजू आहेत. चित्रपटाला सुरुवात होते तीच हायवेवरल्या ट्रॅफिक जॅममध्ये एक सलग चित्रित झालेल्या ‘अनदर डे ऑफ सन’, या अद्भुत गाण्यापासून. यात कॅमेरा आणि नृत्य यांची सांगड कशी घातली असेल याचा जराही पत्ता लागू दिला जात नाही. पुढेही ‘समवन इन द क्राऊड’सारख्या अनेक गाण्यांमध्ये या प्रकारचे लॉन्ग टेक्स आहेत. ‘ए लव्हली नाइट’ हे गाणं स्मरणात राहण्यासारखं आहे. ला ला लॅन्डच्या शेवटाला सुखांत म्हणावं का, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, आणि कदाचित तोच या चित्रपटाचं आजच्या काळात असणं अधिक जाणवून देतो. या चित्रपटाचं सादरीकरण आपण विसरू शकत नाही, पण तो भिडण्यात मात्र त्यातल्या आशयाचा भाग निश्चितच अधिक आहे.