a r rahman hospitalised after experiencing chest pain : ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रेहमान यांना चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहमान यांना रविवारी सकाळी चेन्नई येथील ग्रीम्स रोडवरील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांच्यावर ईसीजी आणि इकोकार्डियोग्राम याबरोबरच इतर अनेक चाचण्या करण्यात आल्या. आज रेहमान यांची अँजिओग्राम चाचणी देखील केली जाऊ शकते. दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार रेहमान यांची प्रकृती स्थिर असल्याचे माहिती समोर आली होती.
दरम्यान संगीतकार ए आर रेहमान यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना गेल्या काही दिवसांमधील प्रवासामुळे डिहायड्रेशन आणि मानेचे दुखण्याशी संबंधित काही वैद्यकीय गुंतागुंत निर्माण झाली होती. आता त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती ए आर रेहमान यांच्या टीमने दिली आहे.
भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वात यशस्वी संगितकार म्हणून ए आर रेहमान यांची ओळख आहे. त्यांना आजवर असंख्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. ज्यामध्ये दोन अकादमी पुरस्कार, दोन ग्रॅमी पुरस्कार, एक बाफ्टा पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब आणि सहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, तसेच भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण याचा देखील समावेश आहे.
रेहमान यांनी १९९२ मध्ये चित्रपट क्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली. कारकिर्दीच्या सुरूवात त्यांनी दिग्गज चित्रपट निर्माते मणिरत्नम यांच्या रोजा या चित्रपटासाठी संगीत देऊन केली. त्यानंतर त्यांनी तमिळ, हिंदी, तेलगु, मल्याळम, इंग्रजी, पर्शियन आणि मँडरिन यासह अनेक भाषांमधील अनेक चित्रपटांसाठी संगीत दिले आहे.
ए आर रेहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांचा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घटस्फोट झाला आहे. दोघांनी २९ वर्षांचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. दोघांनी १९९५ साली लग्न केले होते आणि त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे.