गेल्या काही दिवसांपासून विविध विषयांच्या धाटणीचे मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यात आता लवकरच आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं!!’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतंच या चित्रपटाच्या निमित्ताने डॉ. सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या आजोबांची एक आठवण शेअर केली आहे.
डॉ. सलील कुलकर्णी यांनी नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘एकदा काय झालं!!’या चित्रपटातील गाण्याची लिंक शेअर केली आहे. भीमरुपी असे गाण्याचे नाव आहेत. या गाण्याच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या आजोबांची एक आठवणही सांगितली आहे.
डॉ सलील कुलकर्णी यांची संपूर्ण पोस्ट
“भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना –माझ्या वयाच्या ३ ऱ्या वर्षी माझ्या आजोबांनी हे स्तोत्र शिकवलं होतं .. तेव्हापासून ह्या स्तोत्राची मनामध्ये एक खास जागा आहे. काही वर्षांपूर्वी “भीमरूपी”च्या अचानक पहिल्या काही ओळींना चाल सुचली आणि आजोबांचा आवाज, लहानपणीच्या गोष्टी, आमच्या देव्हाऱ्यातला हनुमानाचा फोटो.. असं सगळं आठवलं..!!
चाल सुचत गेली आणि त्याच सुमारास आमचा कवी मित्र समीर सामंत घरी आला होता.. बोलतां बोलतां त्याला ह्यातल्या काही ओळी ऐकवल्या आणि अचानक वाटलं,” स्तोत्र तर परमपवित्र आणि उच्च दर्जाचं काव्य आहे पण आत्ताच्या काळात समजा आपल्याला हनुमानाला साकडं घालायचं असेल.. तर काय ओळी म्हणू आपण? समीर आणि मी हनुमान आणि हनुमानाच्या लहानपणी ऐकलेल्या गोष्टी ह्यावर गप्पा मारल्या आणि त्याने दोन-चार दिवसांत ह्या अप्रतिम ओळी लिहिल्या.
“विश्वासाची संजीवनी दे , दूर होऊ दे शंका .. द्वेषाची अन अविचाराची दहन होऊ दे लंका,
तू शुद्ध भाव दे भक्ती दे, अन्याय हाराण्या शक्ती दे.. दुष्ट वृत्ती संहार करत.. संचार करत ये हनुमंता…भीमरूपी .. महारुद्रा …” आणि पुढे …“हृदयांना जोडणारा एक सेतू बांध तू , अंतरीच्या अंतरीचा महासागर लांघ तू … अशा ओळी समीरने लिहिल्या. माझ्या धाकट्या भावासारखा असलेला माझा मित्र शुभंकर शेम्बेकर ह्याने अप्रतिम संगीत संयोजन केले आणि स्तोत्राचे पावित्र्य राखत लहान मुलांच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड केलं आणि “ एकदा काय झालं “ या गोष्टी सांगणाऱ्या माणसाच्या गोष्टीला … हनुमानाचा आशीर्वाद मिळाला …!! लहानपणी सर्वात जास्त गोष्टी हनुमानाच्या ऐकल्या .. आणि आता आपल्या गोष्टीत हनुमानाचे स्तोत्र रेकॉर्ड करता आले ह्याचे प्रचंड समाधान आहे”, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान ‘एकदा काय झालं!!’ हा चित्रपट पुणे टॉकीज प्रायव्हेट लिमिटेड आणि हेमंत गुजराथी प्रस्तुत करत आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती गजवदन प्रॉडक्शन्सचे अरूंधती दात्ये, अनुप निमकर, नितीन प्रकाश वैद्य आणि डॉ. सलील कुलकर्णी तसेच शोबॉक्स एन्टरटेंन्मेंटच्या सिद्धार्थ महादेवन, सौमिल श्रुंगारपुरे, सौमेंदु कुबेर आणि सिद्धार्थ खिंवसरा यांनी केली आहे. हा चित्रपट येत्या ५ ऑगस्टा प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अभिनेता सुमीत राघवन, उर्मिला कोठारे, बालकलाकार अर्जुन पुर्णपात्रे यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्यासोबतच मोहन आगाशे, सुहास जोशी, मुक्ता बर्वे, पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले यांसारखे कलाकारही या चित्रपटात झळकणार आहेत.