बऱ्याच वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर संगीतकार विशाल दादलानीने घटस्फोटासाठीचा अर्ज दाखल केला आहे. पत्नी प्रियाली कपुर आणि विशाल गेल्या काही काळापासून एकमेकांपासून वेगळे राहात असल्याचे वृत्त इंडिया टुडेने प्रसिद्ध केले आहे.

मिस मालिनी या संकेतस्थळाशी सदर प्रकरणी बोलताना विशाल म्हणाला, ‘काही वर्षे विभक्त राहिल्यानंतर प्रियाली आणि मी आता रितसर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही आमच्यातील एक खासगी बाब असून सर्वांनीच आमच्या या निर्णयाचा आदर करावा’. सध्या चित्रपट वर्तुळामध्ये विशालच्याच घटस्फोटाविषयीच्या चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. विशालने कधीही त्याचे खासगी आयुष्य प्रसारमाध्यमांसोर उघड केले नाही. असे असले तरीही सध्या मात्र तो त्याच्या खासगी आयुष्यामुळेच चर्चेत आला आहे असे म्हणावे लागेल.

आपल्या या निर्णयामुळे नात्यामध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध आणि दोघांच्याही कुटुंबांमध्ये असणारी मैत्री या सर्वांवर आमच्या या निर्णयाचा काही फरक पडणार नाही असे वक्तव्यही विशालने केले आहे. विशाल दादलानीच्या घटस्फोटाच्या या निर्णयामुळे सध्या बी टाऊनमध्ये विभक्त होणाऱ्या जोडप्यांच्या यादीत आता त्याच्या नावाचाही समावेश झाला आहे.
विशाल दादलानी हा प्रसिद्ध संगीतकार जोडी विशाल-शेखर मधील एक संगीतकार आहे. शेखर रावजीयानी आणि विशाल दादलानी यांची ही जोडी नेहमीच प्रेक्षकांवर त्यांच्या संगीताने आणि धम्माल गाण्यांनी भुरळ घालत असते. आजवर या संगीतकार जोडीने बऱ्याच चित्रपटांना संगीत दिले आहे.