संगीत क्षेत्रात विख्यात असलेले उत्साद रशिद खान यांचं आज निधन झालं. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. संगीत सम्राट अशी ओळख असलेले उस्ताद रशिद खान हे गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. ही झुंज अपयशी ठरली. कोलकाता या ठिकाणी असलेल्या रुग्णालयात त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आलं होतं. उस्ताद राशिद खान यांच्या मागे पत्नी, दोन मुलं आणि मुलगी असा परिवार आहे.
रशिद खान यांच्यावर सुरु होते उपचार
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याविषयीची घोषणा केली. कोलकाता येथील खासगी रुग्णालयात उस्ताद रशिद खान यांच्यावर उपचार सुरु होते. आम्ही त्यांना वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले पण त्यांची प्राणज्योत मालवली असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. आज दुपारी ३.४५ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.
हे पण वाचा- ‘बस.. एक छुरी हलके से चल जाती है..’
ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?
ममता बॅनर्जी यांनी उस्ताद रशिद खान यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. उस्ताद रशिद खान यांचं निधन ही देशाची हानी आहे. तसंच संगीतविश्वातही त्यांच्या निधनामुळे पोकळी निर्माण झाली आहे. मला अद्यापही विश्वास बसत नाही की उस्ताद रशिद खान आपल्यात नाहीत. त्यांच्या निधनाचं वृत्त क्लेशदायक आहे असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
पंडित भीमसेन जोशींच्या गायकीचा प्रभाव
उस्ताद रशिद खान यांच्यावर उस्ताद आमिर खाँ आणि भीमसेन जोशी यांच्या गायकीचा प्रभाव होता. दोन्ही गायकांचा प्रभाव त्यांच्या गाणं म्हणण्याच्या शैलीत जाणावत असे. एका मुलाखतीत उस्ताद रशिद खान यांनी पंडित भीमसेन जोशींची खास आठवण सांगितली होती. “मला साक्षात पंडितजींसह गाणं म्हणायची संधी मिळाली. आमची जुगलबंदी चांगलीच रंगली होती. ही जुगलबंदी झाल्यानंतर पंडितजींनी माझं कौतुक केलं होतं. तसंच साताऱ्याहून उस्ताद रशिद खान यांच्यासाठी खास विड्याची पानं ते पाठवायचे.” अशी आठवण रशिद खान यांनी सांगितली होती. हा किस्साही आज चर्चेत आहे.
रामपूर सासवान घराण्याचे प्रसिद्ध गायक म्हणून उस्ताद रशिद खान यांची ख्याती होती. मागच्या तीन दशकांहून अधिक काळ शास्त्रीय संगीताची सेवा करत आपल्या गायकीतून प्रचंड लोकप्रियता मिळवली. बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी म्हटली होती. त्यात जब वी मेट मधील ‘आओगे जब तुम साजना’ ही बंदिश आजही आपल्या स्मरणात आहे.