‘तप्तपदी’ या मराठी चित्रपटाच्या संगीत प्रकाशनचा सोहळा सोमवारी ‘द लीला’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठया दिमाखात संपन्न झाला. चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक सचिन बळीराम नागरगोजे यांच्या आई-वडिलांच्या हस्ते चित्रपट संगीताच्या सीडीचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी चित्रपटातील कलाकारांनी मंत्रमुग्घ करणारा परफॉर्मन्स सादर केला, तर गीतकार वैभव जोशींनी कविता वाचन करून उपस्थितांची दाद मिळवली. मराठी चित्रपटसृष्टीत घडणत असलेल्या सकारात्मक बदलांची जाणिव करुन देणाऱ्या या संगीत प्रकाशन सोहळ्यात ‘तप्तपदी’चित्रपटातील मुख्य कलाकार कश्यप परुळेकर, वीणा जामकर आणि श्रुती मराठे यांनी ‘अशी ये नजीक..’, आणि ‘हुल देऊन गेला पाऊस..’ या दोन गाण्यांवर बहारदार नृत्य सादर करुन रंग भरले. गायिका सावनी शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातील गीतरचनांनी संगीतप्रेमींचे कान तृप्त केले. तर गीतकार वैभव जोशींच्या आवाजातील कवितावाचन काव्यप्रेमींची दाद मिळविण्यात यशस्वी ठरले.
गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या ‘दृष्टीदान’ या कथेवरुन प्रेरित असलेल्या ‘तप्तपदी’ची निर्मिती सचिन बळीराम नागरगोजे आणि हेमंत भाईलाल भावसार यांनी केली आहे. निर्मितीसोबतच पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शनाची धुराही सचिन बळीराम नागरगोजे यांनी सांभाळली आहे. संवादलेखनात मधुगंधा कुलकर्णी यांची त्यांना साथ लाभली आहे. ‘अशी ये नजीक..’, ‘ही गर्द अमावस नाही..’, ‘हुल देऊन गेला पाऊस..’ , ‘कुठवर तू सोबत, मी फुंकर..’ अशा सहा गीतरचना असून, गीतकार वैभव जोशी यांच्या लेखणीतून त्या अवतरल्या आहेत. सुमीत बेललरी आणि रोहित नागभिडे या संगीतकार दुकलीने स्वप्निल बांदोडकर आणि सावनी शेंडे या गायकांच्या आवाजात त्या ध्वनीमुद्रित केल्या आहेत.
या चित्रपटाची कथा जरी जुन्या काळातील असली तरी चित्रपटाची पटकथा लिहिताना दिग्दर्शक सचिन बळीराम नागरगोजे यांनी आजच्या समाजाला अनुरुप असलेले योग्य ते बदल केले आहेत. दिग्दर्शकाने महाराष्ट्रातील परंपरा, सामाजिक रितीरिवाजांचा तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात समाजामध्ये वाहणाऱ्या नव्या विचारांचा आणि त्यातून घडणाऱ्या सामाजिक बदलांचा सखोल अभ्यास केला आहे.
‘आर्यमान पब्लिसिटी’ प्रस्तुत आणि ‘व्हाईटपेपर कम्युनिकेशन्स’ निर्मित ‘तप्तपदी’ चित्रपटात कश्यप परुळेकर, वीणा जामकर, श्रुती मराठे यांच्यासह नीना कुलकर्णी, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, अंबरिश देशपांडे अशी भक्कम स्टारकास्ट आहे. कला दिग्दर्शन देवदास भंडारे, छायाचित्रण संतोष स्वरणकर, कॉश्चुम रहिम शेख, धनश्री तिवरेकर, मेकअप अमित म्हात्रे, अवधूत राऊत, भारती माने आदींनी तांत्रिक बाजू सांभाळली असून मार्केटिंग व्यवस्थापन राहुल चाटे पाहात आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा