मनोरंजनातून काहीतरी चांगलं व वेगळं सुचवू पाहणारी नाटकं हे मराठी रंगभूमीचं बलस्थान राहिलं आहे. ‘सुमुख चित्र’ निर्मित व ‘अनामिका’ प्रकाशित एक संगीत, नृत्यनाट्य आणि मनाच्या गाभाऱ्यात शिरकाव करणारं ‘उर्मिलायन’ हे नवंकोरं नाटक डिसेंबर महिन्यात रंगभूमीवर येत आहे. आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज्चे संचालक कामेश मोदी यांच्या उपस्थितीत या नाटकाचा मुहूर्त नुकताच झाला.
‘स्व’त्त्व म्हणजे आपले व्यक्तित्व, आपल्या अस्तित्वाची जाणीव. स्वत:ला ओळखता आले तर ‘स्व’त्त्व जपता येते. याच ‘स्व’चा ऊहापोह करत इतिहासाच्या पानांमध्ये दडपल्या गेलेल्या स्वत्त्वाचे एक प्रतीक म्हणजे ऊर्मिला आणि त्या ऊर्मिलेचे ते आयन म्हणजे ‘ऊर्मिलायन’ नाटक!
निर्मिती सुमुख चित्रचे कार्यकारी निर्माता निखिल जाधव हे करीत आहेत. सुनील हरिश्चंद्र लेखक-दिग्दर्शक असून नेपथ्य अरुण राधायण यांनी केले आहे, संगीत निनाद म्हैसाळकर यांचे असून वेशभूषा मंदार तांडेल यांनी केली आहे. प्रमुख कलावंत आणि इतर तंत्रज्ञ सध्या गुलदस्त्यात आहेत. ‘ऊर्मिलायन’सारखे नाटक रंगमंचावर करायला जिगर लागते, धाडस लागते, असे मत विजय निकम यांनी मांडले. तर नाटकाची नाळ संगीताशी बांधलेली असून, त्याचा ताल नृत्यांवर आधारित आहे. ‘ऊर्मिलायन’ नाटकाला नक्कीच वेगळा आयाम देईल असा विश्वास अरुण कदम यांनी व्यक्त केला.