|| रेश्मा राईकवार
एखादी भूमिका कलाकाराच्या वाट्याला अशी येते जणू ती त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठीच लिहिली गेली असावी. अशी एखादी भूमिका हातात आलीच तर ती कितीही अवघड असो, किचकट असो, कलाकार त्या भूमिके ला आपलंसं करून घेतात आणि ती त्यांची ओळख बनते. गेली काही वर्षं सातत्याने हिंदी-मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये निवडक भूमिकांमधून समोर आलेल्या अभिनेत्री अनुजा साठेसाठी ‘अश्रफ भटकर’ ही ती खास भूमिका ठरली आहे. ‘एमएक्स प्लेअर’वर ‘एक थी बेगम’ ही वेबमालिका प्रदर्शित झाली आणि त्याला इतका भरभरून प्रतिसाद मिळाला की या बेगमचा थरार पुन्हा एकदा दुसऱ्या पर्वात जिवंत करण्याची संधी अनुजाला मिळाली…
अश्रफ भटकर ही मी आत्तापर्यंत केलेल्या व्यक्तिरेखांपैकी सगळ्यात कणखर आणि प्रभावी नायिका आहे, असं अनुजा ठामपणे सांगते. त्याला कारणही तसंच आहे. आपल्या पतीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एक सामान्य विवाहित तरुणी गुंड टोळ्यांविरुद्ध उभी राहते, असं या वेबमालिके च्या कथेचं सर्वसाधारण स्वरूप आहे. ऐंशीच्या दशकात गुन्हेगारी जगतात अशा अनेक कणखर स्त्रियांचा दबदबा प्रत्यक्षात लोकांनी पाहिला आहे, अनुभवला आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन ‘एक थी बेगम’ची अश्रफ भटकर जन्माला आली आहे. मुळात आपल्याकडे नायिका ही एखाद्या चित्रपट किंवा वेबमालिकेच्या केंद्रस्थानी असणं ही खूप सहजसोपी गोष्ट नाही आहे. इथे अश्रफची मध्यवर्ती भूमिका आणि तेही अॅक्शन स्वरूपात साकारायला मिळणं अशी दुहेरी संधी अनुजाकडे चालून आली. अभिनेत्रींना सहसा अॅक्शनपट करायला मिळत नाहीत हे सत्य आहे. ‘एक थी बेगम’मधून मला या दोन्ही गोष्टी साध्य करता आल्या. दुसऱ्या पर्वात अश्रफ साकारताना थोडी अधिक मेहनत घ्यावी लागली, कारण या भागात तिला बंदूकही चालवावी लागली आहे, एका ठिकाणाहून दुसरीकडे उड्या मारत अॅक्शन दृश्येही द्यावी लागली आहेत. त्यासाठी सराव करावाच लागला, असं ती सांगते.
एरव्ही चित्रपटात एखादी व्यक्तिरेखा साकारल्यानंतर पुन्हा त्याच्याशी तसा संबंध येत नाही. वेबमालिकांमध्ये मात्र वेगवेगळी पर्व आणि अनेक भागांमधून ती व्यक्तिरेखा पहिल्यासारखीच पकडून ठेवणं हे आव्हान कलाकारांसमोर असतं. अश्रफच्या बाबतीत दुसऱ्या पर्वात ती व्यक्तिरेखा प्रेक्षकांना विश्वासार्ह वाटेल अशापद्धतीने साकारणं हे आव्हान होतं, असं अनुजा म्हणते. पहिल्या पर्वानंतर या व्यक्तिरेखेकडून लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या, पण इथे मला माझ्या कामाची पद्धत उपयोगी पडली, असं तिने सांगितलं. मी कधीच परिणाम काय होईल याचा विचार करून काम करत नाही. प्रेक्षक काय म्हणतील? त्यांना हे आवडेल का? याचा विचार न करता माझे १०० टक्के देण्याचा प्रयत्न मी करते. त्यामुळेच अश्रफ साकारणं मला तितकं अवघड गेलं नाही, असं ती सांगते.
सगळ्यांना समान संधी
सध्या अनेक मराठी कलाकार ओटीटीवर वेबमालिका, वेबपटांमधून काम करताना दिसतात. ओटीटी म्हणून जणू समुद्रातून बाहेर पडलेला खजिना असावा असं काहीसं झालं आहे, असं अनुजा म्हणते. आपल्याकडे देशभरात उत्तम लेखक, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ अशी खूप गुणवत्ता असलेली मंडळी आहेत. ओटीटीमुळे या सगळ्यांनाच काम करण्याची संधी मिळाली आहे. पूर्वी दूरचित्रवाणी आणि चित्रपट ही दोनच माध्यमं होती त्यामुळे अनेकांना गुणवत्ता असूनही काम करण्याची संधी कधीच मिळाली नाही. आता सगळ्यांनाच काम करण्याची समान संधीही मिळते आहे आणि समान कौतुकही वाट्याला येतं आहे, अशी भावना तिने व्यक्त केली. चित्रपटात काम करणारे वेगळे आणि दूरचित्रवाणीवर काम करणारे वेगळे ही विचारधाराच ओटीटी माध्यमाने पुसून टाकली आहे, असं स्पष्ट मत तिने व्यक्त केलं.
बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण
अॅक्शनपटांमधून अनेकदा आपण नायक- नायिकांना सहज बंदूका आणि वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रं चालवताना पाहतो, मात्र पडद्यावर अशी दृश्ये साकारण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण आणि मेहनत घ्यावी लागते. ‘एक थी बेगम’च्या निमित्ताने बंदूक चालवण्याचा हा थरार आपण अनुभवल्याचं ती सांगते. मात्र बंदूक चालवतानाची दृश्यं देणं हे सोपं नव्हतं, असंही ती पुढे स्पष्ट करते. आपण याआधी कित्येकदा खेळण्यातल्या किंवा खोट्या बंदूकाही हाताळलेल्या असतात. चित्रीकरण करत असताना जेव्हा खऱ्या अर्थाने पहिल्यांदा बंदूक हातात घेतली तेव्हा नकळतच कुठलीतरी ताकद आपल्या हातात आली आहे, अशी भावना मनात निर्माण होते. एक अधिकाराची भावना मनात जागते, हा अनुभव शब्दांत वर्णन करणं कठीण आहे, पण म्हणून बंदूक घेऊन दृश्य देताना ती योग्य तऱ्हेने पकडून चालवणं जमतंच असं नाही. बंदूक वजनदार असते, तिचं वजन सांभाळून हात स्थिर ठेवत ती पकडणं आणि चालवणं याचं प्रशिक्षण मला देण्यात आलं. दुसरी गोष्ट बंदूकीचा चाप ओढताक्षणी होणाऱ्या आवाजाने आपले डोळे पटकन बंद होतात. ही स्वाभाविकपणे होणारी प्रक्रिया आहे. मात्र ती टाळून बंदूक चालवत संवाद म्हणण्यासाठी चांगलाच सराव केल्याचंही तिने सांगितलं.
‘योग्य काम मिळेपर्यंत वाट पाहायला हवी’
मी हिंदी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली आणि सुदैवाने माझ्याकडे चांगलेच चित्रपट आणि भूमिका चालून आल्या. मी संजय लीला भन्साळींबरोबर ‘बाजीराव मस्तानी’ केला. त्यानंतर अभिनय देव दिग्दर्शित ‘ब्लॅकमेल’ केला तेव्हा इरफान खानसारख्या दिग्गज कलाकाराबरोबर काम करण्याची संधीही मिळाली. ‘परमाणू’चं दिग्दर्शन हे अभिषेक शर्माचं होतं. या प्रत्येक दिग्दर्शकाबरोबर काम करत असताना सतत काहीतरी नवीन शिकायला मिळालं. इरफान खान, जॉन अब्राहम असे कलाकार आसपास असल्याने सेटवर बसून नुसतं त्यांचं काम पाहिलं तरी बरंच काही शिकता येतं. ते निरीक्षण करत, शिकत, स्वत:त बदल घडवत मी माझी वाटचाल सुरू ठेवली. पण योग्य काम मिळेपर्यंत वाट पाहाण्याची कलाकारांची तयारी असायलाच हवी. त्यासाठी तेवढा संयम ठेवणं गरजेचं असतं, असं ती म्हणतो. गेल्या दीड-दोन वर्षांत करोनामुळे अनेक कलाकारांना आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. अशा परिस्थितीत येईल त्या भूमिका करून पैसा मिळवायचा की योग्य भूमिका मिळेपर्यंत थांबायचं हा शेवटी प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र चांगली भूमिका मिळवण्यासाठी प्रयत्न करणं, वाट पाहाणं आणि त्यासाठी मनाने तयार असणं गरजेचंच असल्याचं ती पुन:पुन्हा सांगते. तिचे दोन चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत आणि काही आगामी प्रकल्पांवरही काम सुरू असल्याचं सांगणारी अनुजा सध्या बेगमच्या यशाचा आनंद घेते आहे.