मराठी मनोरंजन विश्वात सध्या मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटाची मोठी चर्चा सुरू आहे. ३१ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये बालकलाकार मायर वायकूळने आपल्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपटात मायरा जिजा हे पात्र साकारत आहे. त्यामध्ये पोस्टमनकाका आणि तिची सुंदर केमिस्ट्री दाखवण्यात आलिय.
बालकलाकार मायराचा हा पहिलाच चित्रपट आहे. तिने या चित्रपटातील प्रत्येक सीनसाठी खूप मेहनत घेतली आहे. अशात आता चित्रपटात अनेक सीन शूट करताना मायराने ते कसे केले? ती यामध्ये कशी रडली? तसेच रडू यावं म्हणून दिग्दर्शक तिला काय सांगायचे? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात येत आहेत. तसेच हे सर्व जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
मायराने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने चित्रपटात इमोशनल सीन करताना रडू येण्यासाठी ती काय करायची याची माहिती सांगितली आहे. चित्रपटात जिजाच्या शाळेतला स्नेहसंमेलनाचा एक सीन आहे. त्यामध्ये ती भाषण देताना तिच्या बाबांविषयी बोलते आणि रडू लागते, हे तिने कसं केलं? याची माहिती तिने सांगितली आहे.
मायराने सांगितलं, “प्रत्येक सीनवेळी मी कशी रडत होते हे मी आता सांगणार आहे. सीन सुरू असताना सर मला नेहमी ५ मिनिटे द्यायचे. त्या वेळात मी एका ठिकाणी बसून राहायची आणि माझी माझी तयारी करायची. त्यानंतर सर फार जास्त इमोशनल असलेलं गाणं लावायचे. खरं तर ते मीच त्यांना लावायला सांगायचे. या गाण्यामुळे मला रडू यायचं. ते गाणं म्हणजे ‘बाबा मला करमत नाही’. जेव्हा हा शॉट आम्ही करत होतो तेव्हा माझ्या मम्मी पप्पांनीदेखील तो चांगला होईल यासाठी मला मदत केली. तसेच सेटवर असलेल्या अन्य व्यक्तींनीही यासाठी खूप प्रयत्न केले. त्यामुळे हा सीन फार छान झाला.
मायराने पुढे सांगितले, “ते भाषण मी पाठ केलं होतं. माझ्या बाबांनी माझ्याकडून ते पाठ करून घेतलं होतं; पण त्यावेळी मला अजिबात रडायला येत नव्हतं.”
“त्या सीनच्या वेळीच पाऊस सुरू झाला…”
पुढे हा सीन शूट करताना आलेल्या अडचणींवर दिग्दर्शक संकेत माने यांनी सांगितलं, “सीन शूट करताना आम्ही दोन दिवस शाळेत होतो. शाळेतले सगळे सीन झाले होते आणि हा शेवटचा सीन होता. दुसऱ्या दिवशी आम्ही तो शूट करण्यास सुरुवात केली. मात्र, तितक्यात पाऊस सुरू झाला. आता हा महत्त्वाचा सीन असल्यानं मायरानं तो सुरुवातीलाच छान पकडला होता. मात्र, नंतर पाऊस सुरू झाल्यानं मायरा पुन्हा सीन तशा पद्धतीनं पकडू शकेल का याचं मला थोडं टेन्शन आलं होतं. मात्र, पाऊस थांबल्यावर पुढच्या चार तासांत तिनं तो सीन पूर्ण केला.” हा किस्सा सांगत दिग्दर्शकांनी तिचं कौतुक केलं आहे.
मायरा वायकूळने मराठी मनोरंजन विश्वात फार कमी काळात मोठं नाव कमावलं आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत मायरानं परी हे पात्र साकारलं होतं. त्यातील तिचा अभिनय सर्वांना आवडला. त्यानंतर मायरानं हिंदी मालिका विश्वात झेप घेतली. ‘नीरजा एक नई पहचान’ या हिंदी मालिकेतही मायरानं काम केलं. त्यानंतर आता ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटातून ती पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकली आहे.