मानवी भावभावनांचे कवडसे पकडता पकडता जुन्या जाणत्या मनांचीही पुरेपूर दमछाक होते, तिथे जगाच्या व्यवहारापासून कोसो दूर असलेल्या छोट्यांच्या निरागस मनाला याचा थांग कसा लागायचा? या प्रश्नाला एकच एक उत्तर नाही. प्रत्येक निरागस, निष्पाप कोवळं मन अनुभवांच्या शिदोरीतून हे कवडसे जमा करत जातं. आपोआपच अनेक मोठ्या गोष्टींची उत्तरं त्यांच्या जाणिवेतून नेणिवेचा भाग होत जातात. अशाच एका निरागस मनाला गवसलेल्या अलौकिक प्रेमाची गोष्ट ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या संकेत माने दिग्दर्शित चित्रपटात पाहायला मिळते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटाची कथा एकदम साधी सरळ आहे. कथाबीज तसं छोटं असलं तरी त्यातून जे लेखक – दिग्दर्शकाला सांगायचं आहे त्याचा गाभा मोठा आहे. कथेपेक्षाही त्यातला भाव पोहोचवणं हे अशा चित्रपटांसमोरचं मोठं आव्हान असतं. त्यासाठी पटकथा मांडणी आणि अभिनय दोन्ही चोख हवं. या चित्रपटाची कथा दिग्दर्शक संकेत माने यांचीच आहे, त्यामुळे कथेतून काय मांडायचं आहे याबद्दलची त्यांची स्पष्टता दिग्दर्शकीय मांडणीतही जाणवते. सुमित गिरी यांच्याबरोबर मिळून संकेत माने यांनी पटकथा लेखन केलेलं आहे. कोल्हापुरातल्या एका गावात राहणाऱ्या जिजा या लहान शाळकरी मुलीची गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळते. आई आणि आजीबरोबर राहात असलेल्या जिजाला एकदा शाळेत शिक्षा म्हणून मुख्याध्यापक वार्षिक वक्तृत्व स्पर्धेत भाषण करायला सांगतात आणि विषय देतात ‘माझे बाबा’. बाबांविषयी बोलायचं तर त्यांच्याबद्दल काहीतरी माहिती हवी म्हणून बाबांना भेटायचं आहे असा लकडा जिजा आईकडे लावते. नवरा गेल्यानंतर एकटीने घराची आर्थिक आणि सगळीच जबाबदारी अंगावर घेतलेली, परिस्थितीने काहीशी त्रासलेली जिजाची आई तिला तिचे वडील देवाघरी गेले आहेत असं सांगून मोकळं होते. त्या क्षणापासून देवाच्या घरी असलेल्या वडिलांशी संपर्क करायची छोट्या जिजाची खटपट सुरू होते. या चिमुकलीच्या शोधप्रवासात तिची वर्गमैत्रीण शुभी तिच्याबरोबर आहे. या दोघी आपापल्या बुद्धीने हे कोडं सोडवू पाहतात, त्यातून त्यांच्याबरोबर कोण कोण जोडलं जातं? जिजाचं हे कोडं कसं सुटतं? जीवनातलं एक मोठं सत्य तिचं तिलाच कसं आकळतं? या प्रश्नांची उत्तरं शोधत शोधत रंगवलेला प्रवास म्हणजे ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’.

या चित्रपटाचं शीर्षक कथेला अगदी अनुरूप असं आहे. कथेचा जीव छोटा असला तरी त्याच्या विषयाची व्याप्ती मोठी आहे. त्यातही त्याचा भावार्थ पोहोचवणं हे आव्हान आहेच, तेही छोट्यांच्या भावविश्वाचा विचार करत ही सगळी मांडणी करणं हे दिग्दर्शकासमोरचं मोठं आव्हान होतं. हे आव्हान दिग्दर्शकीय मांडणी आणि कलाकारांच्या अभिनयाच्या जोरावर संकेत माने यांनी उत्तमपणे पेलण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध तसा रेंगाळत सुरू होतो, पण जिजा आणि शुभीची मैत्री, सपरंच आजीबरोबरची तिची दोस्ती, पोस्टमन काकांना लागलेला तिचा लळा, दु:खातही निर्मळ मनानं आनंदाने जगणाऱ्या जिजा, आई आणि आजीचं छोटंसं विश्व, बाप्याच्या निमित्ताने जिजाच्या मनात फुललेला करुणेचा झरा या सगळ्याच भावभावना त्या त्या व्यक्तिरेखांच्या मदतीने उत्तम चित्रित झाल्या आहेत. त्यामुळे चित्रपट रेंगाळत राहिला, तरी तो कंटाळत नाही.

सपरंच आजीसारख्या काही निवडक पात्रांची मांडणी दिग्दर्शकाने उत्तम जमवून आणली आहे. परिणामी, चित्रपटाचा अधिक प्रभाव पडतो. संगी आणि गण्याच्या व्यक्तिरेखा आणि त्यांचे कथानक मात्र ठिगळ जोडल्यासारखे वाटते, काही अनावश्यक प्रसंगाला चाळणी लावता आली असती. मात्र, नको त्या आचरट प्रसंगांचा भरणा नाही, भडक मांडणी नाही किंवा अनावश्यक गाणीही नाहीत, हा मोह बाजूला सारण्यासाठी खरोखरच दिग्दर्शकाचे कौतुक करायला हवं. मायरा वायकूळच्या स्वभावात आणि व्यक्तिमत्त्वात असलेला गोडवा, निरागसपणा याचा सुंदर वापर दिग्दर्शकाने जिजाच्या भूमिकेसाठी करून घेतला आहे.

मुक्काम पोस्ट देवाचं घर

दिग्दर्शक – संकेत माने

कलाकार – मायरा वायकूळ, मंगेश देसाई, कल्याणी मुळ्ये, उषा नाडकर्णी, सविता मालपेकर, सचिन नारकर आणि स्पृहा परब.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Myra vaikul upcoming movie mukkam post devach ghar review amy