रेश्मा राईकवार
एखाद्या माणसाच्या मनात आपल्याबद्दल काय सुरू आहे हे कळणं खचितच सोपं नाही. तरीही थोडीफार कल्पना आपल्याला असतेच आणि बाकी ऐकीव माहितीवर आपण एखाद्याबद्दलचं मत ठरवत जातो. अर्थात त्यातलं खरं-खोटं समजता समजता वेळही जातो आणि अनेक गोष्टी हातून निसटतात. या सगळय़ात नाटय़ आहे आणि त्याच नाटय़ाचा फायदा घेत रचलेली रहस्यमय कथा अनु मेनन दिग्दर्शित ‘नीयत’ या चित्रपटात पाहायला मिळते.
‘नीयत’ चित्रपटाच्या पोस्टरवर ठळकपणे फक्त अभिनेत्री विद्या बालनचाच चेहरा दिसत असला तरी यात भरपूर व्यक्तिरेखा आणि तितकेच छोटे-मोठे कलाकार असा पसारा आहे. बरं सगळी कथा घडते ती स्कॉटलंडमधील एका भव्य आलिशान महालात.. त्यामुळे एकाच जागेत इतक्या सगळय़ा व्यक्तिरेखांमधील नाटय़ जमवायचं हेच कौशल्याचं काम. अनू मेनन यांनी याआधी ‘शकुंतला देवी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यामुळे त्यांचा हाही चित्रपट काहीसा वेगळा असेल असं वाटतं.. तसा तो मांडणीतल्या वेगळेपणाचा प्रयत्न बव्हंशी स्कॉटलंडसारखं चित्रीकरण स्थळ, तो महाल, आजूबाजूचा देखणा परिसर अशा बाकी तपशिलात खर्च पडला आहे. भारतातून २० हजार कोटींचा अपहार करून स्कॉटलंडमध्ये आपल्या महालात लपलेला उद्योजक आशिष कपूर. (त्याच्या व्यवसायाचा तपशील आणि एकूणच व्यक्तिरेखा ही विजय मल्ल्यांशी साधम्र्य साधणारी आहे). तर स्कॉटलंडमध्ये पळून आल्यानंतर तिकडे भारतात आशीष कपूरच्या सात कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडतात. त्याच्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेले कित्येक महिने पगार मिळालेला नाही. त्यामुळे आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. या सगळय़ा पार्श्वभूमीवर आशीष कपूर यांनी आपल्या वाढदिवसाचं निमित्त साधून अगदी जवळच्या काही माणसांना आपल्या महालात बोलावलं आहे. सगळे एकत्र आल्यानंतर आशीष कपूरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणखी एक अनोळखी पाहुणी या महालात दाखल होते. त्यानंतर खऱ्या अर्थाने तिथे जमलेल्या व्यक्तींचा खरा चेहरा हळूहळू उलगडत जातो.
हा रहस्यपट आहे, पण त्याची सुरुवात केवळ स्कॉटलंडमध्ये दूर हिरव्यागार डोंगरावर एका टोकाला समुद्राच्या लाटा अंगावर झेलत उभ्या असलेल्या एका महालाच्या आजूबाजूचं नैसर्गिक गूढ वातावरण कॅमेऱ्यात पकडत होते. त्या एकाकी महालाच्या तपशिलानंतर त्यात उगवणाऱ्या एकेक व्यक्ती आणि त्यांच्या परिचयातच पहिला कमीत कमी २०-२५ मिनिटांचा काळ खर्ची पडला आहे. एक श्रीमंत व्यक्ती, त्याची तथाकथित प्रेयसी, त्याचा जिवलग मित्र आणि त्याची पत्नी, मुलगा, त्याचा सगळा कार्यभार पाहणारी व्यवस्थापक असे सगळेच चेहरे एकत्र येतात. त्यांच्यात आपापसात होणाऱ्या संवादातून हळूहळू तिथे आलेल्या प्रत्येक माणसाचा स्वभाव, त्याच्या मनातली चलबिचल उघड होत जाते आणि तरीही आपल्यासमोर जे घडतं आहे ते तिथे जमलेल्या व्यक्तींनीच घडवलं आहे की अजून कोणी तिथे उपस्थित आहे ज्याची तिळमात्र कल्पना आपल्याला नाही, हा चित्रपटातला खरा गोंधळ आहे. हे नाटय़ अधिक गुंतागुंतीचं किंवा धारदार, रहस्यपटाला अपेक्षित असलेल्या वेगवान मांडणीतून यायला हवं होतं. त्याउलट एकेक गोष्ट संथपणे पुढे येत राहते आणि चित्रपट कंटाळवाणा वाटू लागतो. अशा पद्धतीचे गुंतागुंतीचे किंवा फसवणुकीचे कथानक असलेला ‘नीयत’ हा नवीन चित्रपट नाही ही एक बाब. दुसरं धक्कातंत्राचा वापरही इथे प्रभावीपणे केलेला नाही. त्यामुळे एकापाठोपाठ एक घडणारे प्रसंग आणि वाढता गोंधळ यापलीकडे पडद्यावर काही जाणवत नाही.
विद्या बालन इथे मध्यवर्ती भूमिकेत आहे, मात्र तरीही बराचसा चित्रपट आशीष कपूर या व्यक्तिरेखेवर केंद्रित आहे. एका क्षणी तो खरा की खोटा इथे चित्रपट अधिक रेंगाळतो. त्या तुलनेत एक अधिकारी म्हणून वावरणाऱ्या विद्या बालनचा एकूणच आवेश थंड आहे. ती हुशार आहे. प्रत्येक गोष्ट चटकन आणि अचूक हेरते. विद्या बालनने अशी रहस्यमय भूमिका याआधी ‘कहानी’मध्ये साकारली आहे. तिच्या देहबोलीतला वेग, संवादाची शैली, नजरेतून बोलणं हा सारा प्रकार इथे फार गुळमुळीत पद्धतीने आला आहे. आशीष कपूरची व्यक्तिरेखा अभिनेता राम कपूर यांनी साकारली आहे. त्या व्यक्तिरेखेतला एकूणच आक्रमकपणा आणि साध्याभोळय़ा मुखवटय़ामागचा धूर्त चेहरा राम कपूर यांनी सहजी साकारला आहे. या दोघांशिवाय राहुल बोस, नीरज काबी, अमृता पुरी, शहाना गोस्वामी, शशांक अरोरा, प्राजक्ता कोळी अशा कित्येक नावाजलेल्या कलाकारांची फौज या चित्रपटात आहे. उत्तम कलाकार आणि नाटय़मय गोष्ट असूनही दिग्दर्शक अनु मेनन यांचा मांडणीतला प्रयोग फसला आहे. त्यामुळे चांगला रहस्यपट बनण्याची क्षमता असलेला ‘नीयत’ रटाळवाणा प्रयोग ठरतो.
नीयत
दिग्दर्शक – अनु मेनन
कलाकार – विद्या बालन, राम कपूर, राहुल बोस, नीरज काबी, दिपानिता शर्मा, अमृता पुरी, शहाना गोस्वामी, शशांक अरोरा, प्राजक्ता कोळी, निकी वालिया, दानिश राझवी