इस्रायली चित्रपट दिग्दर्शक नदाव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. लॅपिड यांनी चित्रपटाला ‘व्हल्गर’ आणि ‘प्रपोगंडा’ करणारा म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी याचा विरोध केला. इस्त्रायलचे मध्य-पश्चिम भारतातील राजदूत कोब्बी शोशानी यांनीदेखील लॅपिड यांचं वैयक्तिक मत असल्याचं म्हणत वादातून काढता पाय घेतला. दरम्यान, आता लॅपिड यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.
हेही वाचा – ‘काश्मीर फाइल्स’ प्रकरणी इस्रायलचा माफीनामा; लापिड यांनी केलेली टीका वैयक्तिक : राजदूत
लॅपिड यांनी त्यांच्या वक्तव्यानंतर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच आपल्याला त्याबद्दल बोलणं महत्त्वाचं वाटल्याने आपण भाष्य केलं, असंही त्यांनी म्हटलंय. लॅपिड म्हणाले, “काश्मीरमधील भारतीय धोरणाचे समर्थन करणारा चित्रपट पाहून मला धक्का बसला. या चित्रपटात फॅसिस्ट फीचर्स आहेत. हा चित्रपट ९० च्या दशकातील काश्मिरी हिंदूंच्या पलायनावर आधारित आहे. येत्या काही वर्षांत असा चित्रपट इस्रायलमध्ये बनला तर आश्चर्य वाटणार नाही,” असंही ते म्हणाले.
इंडिया टुडेने इस्रायलचे स्थानिक माध्यम यनेटच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, लॅपिड म्हणाले की, “माझ्यासाठी तेवढ्या मोठ्या व्यासपीठावरून असं बोलणं आणि राजकीय विधान करणं सोपं नव्हतं. मला माहीत होतं की ही एक अशी घटना आहे, जी त्या देशाशी जोडलेली आहे. तिथला प्रत्येक जण सरकारचं कौतुक करतोय. मी तिथे पाहुणा होतो, मी इथल्या ज्युरीचा अध्यक्ष आहे, त्यामुळे मला चांगली वागणूक दिली गेली आणि मी तिथेच त्यांच्या इव्हेंटमध्ये त्यांच्यावर टीका करणं, सोपं नव्हतं. खरं तर माझ्या मनात भीती होती, अस्वस्थता होती, तरीही मी बोललो, पण त्याचे परिमाण काय होतील, हे मला माहीत नव्हतं, म्हणून मी काहीशा भीतीनेच ते वक्तव्य केलं. त्यानंतर कालचा संपूर्ण दिवस मी भीतीत घालवला,” असं ते म्हणाले.
त्यांच्या या वक्तव्यानंतर झालेल्या वादाबद्दल बोलताना लॅपिड म्हणाले, “त्या हॉलमध्ये हजारो लोक बसले होते. स्थानिक कलाकारांना पाहून सगळे आनंदी होते, बरेच जण सरकारचा जयजयकार करत होते. ज्या देशांमध्ये मनातलं बोलण्याची किंवा सत्य बोलण्याची क्षमता कमी होत चालली आहे, तिथं कोणीतरी बोलणं आवश्यक आहे. जेव्हा मी हा चित्रपट पाहिला, तेव्हा मी तसा चित्रपट इस्त्रायलमध्ये बनण्याची कल्पना करू शकलो नाही,” असं लॅपिड यांनी सांगितलं.
हेही वाचा – “चित्रपटाला व्हल्गर म्हणणाऱ्यांच्या विरोधात…” ‘द काश्मीर फाइल्स’ वादावर पल्लवी जोशींनी मांडली भूमिका
काय म्हणाले होते लॅपिड?
इस्त्रायलमधील चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते लॅपिड या कार्यक्रमात चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देताना असे म्हणाले होते की, “द काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण विचलित झालो आहोत. हा चित्रपट म्हणजे त्रस्त करणार अनुभव आहे. हा चित्रपट आम्हाला व्हलगर (अश्लील) तसेच प्रपोगंडा (विशिष्ट उद्देशाने प्रचार करण्याच्या हेतूने बनवलेला) वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणं योग्य नाही. मी माझ्या भावना या मंचावर मोकळेपणाने मांडू शकतो. ही चर्चा होणं गरजेचं आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता ही चर्चा होणं कलेसाठी गरजेचं आहे,” असं लॅपिड म्हणाले होते.