बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री नफीसा अली 3 वर्षानंतर पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. अभिनेत्री नफीसा बराच काळ कर्करोगाशी लढत होत्या आणि आता त्यांनी कर्करोगावर यशस्वी मात दिली असून पुन्हा एकदा नव्या जोमानो बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याच्या तयारीत आहेत. 2007 मध्ये रिलीज झालेल्या ‘लाइफ इन अ मेट्रो’ चित्रपटा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो त्या प्रत्येक वेळी अभिनेत्री नफीसा यांची आठवण आवर्जून काढली जाते. या चित्रपटात त्यांनी धर्मेंद्रसोबत एक किसिंग सीनही दिला होता. यावर बोलताना नफीसा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. आज बॉलिवूडमध्ये वृद्ध अभिनेते-अभिनेत्रींसाठी चांगली स्क्रीप्ट लिहिली जात आहे, हे पाहून आनंद होतोय, असं नफीसा म्हणाल्या.

‘लाइफ इन अ मेट्रो’च्या किसिंग सीनबद्दल विचारल्यानंतर नफीसा म्हणाल्या, “बऱ्याच वर्षानंतर दोन वृद्ध कपल एकमेकांना कसे भेटतात याची एक मजेदार कथा त्या चित्रपटात होती. हे दोघे वृद्ध जुने प्रेमी असतात. हा संपूर्ण आयुष्यभर चालणारा रोमान्स होता आणि त्यासाठी हा सीन आवश्यक होता. दिग्दर्शक अनुराग बासूने मला स्क्रीप्टमध्ये हा सीन किती महत्त्वाचा होतो, हे सांगितलं होतं. म्हणून आम्ही तो सीन करण्याचा निर्णय घेतला. तो एक चित्रपट होता आणि आम्ही सर्व प्रोफेशनल आहोत. या व्यतिरिक्त, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी अनेक वर्षापासूनचे माझे चांगले मित्र आहेत.”

यापुढे बोलताना नफीसा म्हणाल्या, ‘ ‘लाइफ इन अ मेट्रो’ पाहिल्यानंतर मला एक तरुण मुलगी भेटली. तिने तिच्या विधवा आईला वर्षानुवर्षे लग्न करण्यापासून कसे रोखले होते. जेव्हा तिने हा चित्रपट पाहिला तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिने किती मोठी चूक केली आहे. यानंतर तिने तिच्या आईला जीवनसाथी शोधण्यात मदत करण्यास सुरुवात केली, असं तिने मला सांगितलं. त्यामुळे मला आनंद आहे की मी काही उत्तम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लाइफ इन मेट्रो हा देखील सर्वात सुंदर बनवलेल्या चित्रपटांपैकी एक आहे.”

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे नफीसा गेली दीड वर्षे गोव्यात राहत होत्या. आता त्या त्यांच्या आगामी चित्रपटासाठी मुंबईत परतल्या आहेत. त्या म्हणाला, “माझे कुटुंब दिल्लीत राहतं आणि मला तिथे जायला आवडतं. पण आता माझा चित्रपट सुरू होणार आहे आणि कामावर परत आल्याचा मला आनंद आहे. मला चित्रपट पाहायला आणि त्यात अभिनय करायला आवडतं. मला आनंद आहे की, मी श्याम बेनेगल, शशी कपूर, शबाना आझमी, अमिताभ बच्चन आणि मामुट्टी सारख्या महान अभिनेते आणि दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे.”