Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Wedding : नागा चैतन्य व सोभिता धुलिपाला यांचा विवाहसोहळा हैदराबाद येथील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये थाटामाटात पार पडला आहे. हा स्टुडिओ अक्कीनेनी कुटुंबीयांच्या मालकीचा आहे. चैतन्य आणि सोभिता यांच्या लग्नसोहळ्यासाठी तेलुगू इंडस्ट्रीमधली अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहिली आहेत. चिरंजीवी, पवन कल्याण, अल्लू अर्जुन, राणा दग्गुबती, राम चरण आणि त्याची पत्नी उपासना, महेश बाबू व त्याची पत्नी अभिनेत्री नम्रता शिरोडकर हे सगळे या लग्नसोहळ्याला उपस्थित आहेत.
समांथा रुथ प्रभूशी घटस्फोट घेतल्यावर नागा चैतन्य सोभिताला डेट करत असल्याच्या चर्चा मनोरंजनविश्वात सुरू होत्या. अखेर ८ ऑगस्टला २०२४ ला या दोघांचा साखरपुडा पार पडल्याची आनंदाची बातमी नागार्जुन यांनी एक्स पोस्ट करत दिली होती. यानंतर नागा चैतन्य आणि सोभिता यांच्या लग्नाआधीच्या समारंभांना सुरुवात झाली होती. अखेर आज ( ४ डिसेंबर ) सायंकाळी या जोडप्याची साता जन्माची गाठ बांधली गेली आहे.
नागा चैतन्य ( Naga Chaitanya ) आणि सोभिताचं लग्न पारंपरिक पद्धतीने पार पडलं. लग्न लागताना अभिनेत्रीने खास पारंपरिक कांजीवरम सिल्क साडी नेसली होती. सुंदर साडीवर सोभिताने भरजरी दागिने घालून तेलुगू तर, चैतन्यने आपले आजोबा अक्किनेनी नागेश्वर राव यांच्या कालातीत शैलीची आठवण करून देणारा ‘पंचा’ नावाचा पारंपारिक पोशाख घातला होता.
सोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पण, त्यांनी आपलं नातं कधीच उघडपणे स्वीकारलं नव्हतं. यावर्षी ऑगस्टमध्ये साखरपुड्याचे फोटो शेअर करत नागा चैतन्यने त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. हैदराबाद येथे चैतन्यच्या राहत्या घरी या जोडप्याने गुपचूप साखरपुडा उरकला होता.
दरम्यान, नागा चैतन्यचं यापूर्वी सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभूशी लग्न झालं होतं. २०१७ मध्ये ते दोघंही विवाहबंधनात अडकले होते. यानंतर २०२१ मध्ये समांथा व चैतन्यने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर ३ वर्षांनी नागा चैतन्यने आता एका नव्या आयुष्याला सुरुवात केलेली आहे. सध्या संपूर्ण कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.