नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभू मनोरंजन क्षेत्रातील एक अशी जोडी आहे जे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. दोघांचा प्रवास लव्हस्टोरीपासून सुरू झाला आणि घटस्फोटापर्यंत येऊन संपला. पण त्यानंतर ही जोडी सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत राहिली होती. याशिवाय त्यांच्या वैयक्तीक आयुष्यामुळेही हे दोघं अनेकदा चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच समांथाने सोशल मीडियावर तिच्या आजारपणाविषयी माहिती दिली होती. ज्यावर अनेक सेलिब्रेटींनी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर आता यात तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि अभिनेता नागा चैतन्यच्या नावाचाही समावेश झाला आहे.
आगामी चित्रपट ‘यशोदा’मुळे चर्चेत असलेल्या समांथा रुथ प्रभूने अलिकडेच स्वतःचा एक फोटो शेअर करत ती मायोसिटिसशी झुंज देत असल्याचं सांगितलं होतं. या बातमीनंतर समांथाचा मित्रपरिवार तसेच जवळचे नातेवाईकही हैराण झाले होते. पण आता एक रिपोर्ट समोर येत आहे, ज्यामध्ये तिचा पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यही समांथाच्या तब्येतीबद्दल चिंतेत असल्याचे सांगितले जात आहे आणि त्याने समांथाला फोन करून तिच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे.
आणखी वाचा-“खूप सारं प्रेम आणि…”, समांथाच्या आजाराबद्दल समजताच नागा चैतन्याच्या भावाने केलेली कमेंट चर्चेत
रिपोर्ट्सनुसार, समांथाची तब्येत ठीक नसली तरी ती हळूहळू बरी होत आहे. तिच्या आजाराचे निदान झाल्यानंतर नागा चैतन्य तसेच त्याचे कुटुंबीय खूप अस्वस्थ आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की नागा चैतन्यने समांथाला फोन करून तिच्या तब्येतीची चौकशी केली. या बातमीनंतर दोघांचे चाहते खूप खूश आहेत कारण दोघांमध्ये सर्वकाही ठीक व्हावं अशी चाहत्यांची इच्छा आहे.
आणखी वाचा-आजाराबद्दल कळताच चिरंजीवींनी समांथाला पाठवला खास निरोप; म्हणाले, “परिस्थितीशी झुंजणारी…”
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू मायोसिटिस नावाच्या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याची माहिती दिली होती. समांथाच्या या पोस्टनंतर चाहते आणि सहकलाकार ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. समांथाने सलाईन लावलेला फोटो शेअर करत तिला काही महिन्यांपूर्वी या आजाराची माहिती मिळाल्याचं सांगितलं होतं. तिने लिहिलं, “काही महिन्यांपूर्वी मला मायोसिटिस नावाचा ऑटोइम्यून आजार असल्याचे निदान झाले. मला वाटले की मी बरे झाल्यानंतर याबद्दल सांगेन, पण याक्षणी त्यातून बरं होण्यासाठी माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत आहे. मी लवकरच पूर्णपणे बरी होईन, असा विश्वास डॉक्टरांना आहे.”