Naga Chaitanya Sobhita Dhulipala Engaged: तेलुगू अभिनेता नागा चैतन्यने अभिनेत्री सोभिता धुलीपालाशी साखरपुडा केला आहे. दोघांचाही साखरपुडा आज (८ ऑगस्ट रोजी) नागार्जुन यांच्या घरी पार पडला. नागार्जुन यांनी मुलाच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.
नागा चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी एक्सवर फोटो पोस्ट करून मुलाच्या साखरपुड्याची माहिती दिली. त्यांच्या हैदराबादमधील घरीच साखरपुड्याचा समारंभ पार पडला. नागार्जुन यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये सोभिता व नागा चैतन्य दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत.
नागार्जुन यांची पोस्ट –
“मला माझा मुलगा नागा चैतन्य व शोभिता धुलीपाला यांच्या साखरपुड्याची घोषणा करताना खूप आनंद होत आहे. त्यांचा साखरपुडा आज सकाळी ९:४२ वाजता पार पडला. सोभिताचे आमच्या कुटुंबात स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. दोघांचेही अभिनंदन. त्यांना आयुष्यभर प्रेम व आनंदासाठी शुभेच्छा.
८.८.८
अनंत प्रेमाची सुरुवात,” असं कॅप्शन त्यांनी हे फोटो शेअर करताना दिलं आहे.
या फोटोंवर कमेंट करून चाहते चैतन्य व सोभिताला शुभेच्छा देत आहेत. चैतन्य व सोभिता काही वर्षांपासून डेटिंग करत होते. आज दोघांनी साखरपुडा करून आपलं नातं अधिकृत केलं. चैतन्य व सोभिताला नवीन इनिंगसाठी सिनेसृष्टीतील कलाकार व चाहते शुभेच्छा देत आहेत.
दरम्यान, काही काळापूर्वी नागा चैतन्य व सोभिता यांच्याबरोबरचा फोटो विदेशातील एका रेस्टॉरंटमधील शेफने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. हे दोघेही अनेकदा रेस्टॉरंटमध्ये चाहत्यांना एकत्र दिसायचे, तसेच ते व्हेकेशनला एकत्र जायचे. त्यांनी याबाबतचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर केले नव्हते, तरी चाहते अनेकदा त्यांचे फोटो पोस्ट करायचे.
नागा चैतन्य व समांथा रुथ प्रभूचा तीन वर्षांपूर्वी घटस्फोट
दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू व अभिनेता नागा चैतन्य यांनी २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली होती, त्यानंतर अवघ्या चार वर्षांनी २०२१ मध्ये घटस्फोट घेतला. नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडले आणि २०१७ मध्ये लग्न केले होते. चार वर्षांनंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर नागा चैतन्य अभिनेत्री शोभिता धुलिपालाच्या प्रेमात पडला. आता दोघांनी साखरपुडा केला आहे.