‘सैराट’ चित्रपटाच्या झिंगाट या गाण्यापासून ते ‘आर्ची’च्या प्रत्येक संवादापर्यंतची चर्चा दिवसेंदिवस वाढतच आहे. लोकप्रियतेच्या पलीकडे जात आता या चित्रपटातील कलाकारांना विविध कार्यक्रमांसाठीही या चित्रपटातील कलाकारांना निमंत्रण दिले जात आहे. पण, चित्रपटाबद्दल प्रमाणाबाहेर होणाऱ्या चर्चेला बहुधा या चित्रपटाचे दिग्दर्शकही काहीसे वैतागले असावेत. गेल्या काही महिन्यांपासून फक्त ‘सैराट’विषयीच बोलून आपण वैतागलो असल्याची प्रतिक्रिया दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिली आहे.
पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या तिसऱ्या स्मृतिदीनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. ‘विवेक लघुपट महोत्सवा’त उपस्थित असलेल्या नागराज मंजुळे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे अनेकांना धक्काच बसला आहे. नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या ‘सैराट’ या चित्रपटाने प्रदर्शनानंतर फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही घवघवीत यश मिळवले आहे.