South Superstar Nagarjuna : दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्य व अभिनेत्री सोभिता धुलीपाला यांचा साखरपुडा ८ ऑगस्ट रोजी पार पडला. हैदराबाद येथे चैतन्याच्या राहत्या घरी या जोडप्याने गुपचूप साखरपुडा उरकला. नागा चैतन्यचं यापूर्वी सुपरस्टार अभिनेत्री समंथा रुथ प्रभूशी लग्न झालं होतं. २०१७ मध्ये ते दोघंही विवाहबंधनात अडकले होते. यानंतर २०२१ मध्ये समंथा व चैतन्यने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर ३ वर्षांनी नागा चैतन्यने आता एका नव्या आयुष्याला सुरुवात केलेली आहे. यावर अभिनेत्याचे वडील व ज्येष्ठ अभिनेते नागार्जुन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुलाच्या साखरपुड्यावर नागार्जुन यांची प्रतिक्रिया
अभिनेते नागार्जुन ( Nagarjuna ) यांनी ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या मुलासाठी आनंदी असल्याचं सांगितलं आहे. अभिनेते म्हणाले, “नागा चैतन्य आयुष्यात पुन्हा एकदा आनंदी झालाय…यासाठी मी प्रचंड खूश आहे. कारण, गेली काही वर्षे आमच्या कुटुंबासाठी खूप कठीण होती. समंथाबरोबर घटस्फोट झाल्यावर चैतन्य खूप दु:खी होता. माझा मुलगा कधीच त्याच्या भावना उघडपणे व्यक्त करू शकत नाही. पण, मला माहिती होतं की, तो प्रचंड दु:खी आहे. त्यामुळे पुन्हा त्याला आनंदी पाहणं माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. शोभिता व चैतन्य यांची जोडी खरंच खूप छान आहे आणि दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे.”
हेही वाचा : जान्हवीला आली भोवळ! रितेशचा खुलासा ऐकून सर्वांनाच बसला धक्का; घरात होणार नवीन ड्रामा, पाहा प्रोमो
समंथाचे पूर्वाश्रमीचे सासरे नागार्जुन ( Nagarjuna ) तिला आपली मुलगी मानायचे आणि त्यांचं बॉण्डिंग आजही चांगलं आहे याविषयी नागार्जुन सांगतात, “हो नक्कीच…आम्ही अजूनही तसेच आहोत. कारण, त्या दोघांमध्ये ज्या गोष्टी घडल्या ती पूर्णपणे वेगळी बाब आहे.” याशिवाय इथून पुढे नागा चैतन्य व सोभितासाठी मी आनंदी असून, त्यांच्यातलं प्रेम असंच बहरत राहुदेत असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा : बॉक्स ऑफिस कलेक्शन म्हणजे काय? चित्रपटांची दर आठवड्याची कमाई नेमकी कशी मोजली जाते? जाणून घ्या…
दरम्यान, सोभिता आणि चैतन्य यांच्या साखरपुड्याला केवळ जवळचे कुटुंबीय व काही मोजकी मित्रमंडळी उपस्थित होती. नागा चैतन्यचा समंथाशी घटस्फोट झाल्यावर २०२१ नंतर अभिनेत्याला सोभिताबरोबर एकत्र परदेशात फिरताना पाहण्यात आलं होतं. परंतु, दोघांनीही त्यांच्या नात्याची अधिकृतपणे घोषणा केलेली नव्हती. अखेर नागार्जुन ( Nagarjuna ) अक्कीनेनी यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत चैतन्य आणि सोभिता यांच्या साखरपुड्याची माहिती सर्वांना दिली.
© IE Online Media Services (P) Ltd