कलर्स टीव्हीवरील ‘नागिन ६’ ही मालिका सध्या बरीच चर्चेत आहे. या मालिकेत अभिनेत्री सुधा चंद्रन यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आपल्या ३५ वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत सुधा यांनी बरेच टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांचा पदार्पणाचा चित्रपट ‘मयूरी’साठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. पण त्यावेळी त्यांना ज्या गोष्टींचा सामना करावा लागला नव्हता त्या गोष्टी त्यांना आता कराव्या लागत आहेत. सुधा चंद्रन यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनय क्षेत्रातील सध्याच्या परिस्थितीबाबत खंत व्यक्त केली आहे.
‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत सुधा चंद्रन यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या घटनांचा अनुभव शेअर केला. त्या म्हणाल्या, ‘या क्षेत्रात तब्बल ३५ वर्षं काम केल्यानंतरही मला आजही कधी कधी ऑडिशन देण्यास सांगितलं जातं. हे खूपच दुःखद आहे. एवढी वर्षं काम करूनही जेव्हा अशी मागणी केली जाते तेव्हा जास्त खंत वाटते.’
सुधा चंद्रन म्हणाल्या, ‘मी स्पष्टपणे सांगते की मी ऑडिशन देणार नाही. जर मला आज ऑडिशन द्यावी लागत असेल तर या क्षेत्रात ३५ वर्षं काम केलं त्याचं काय? आणि जर तुम्हाला माझ्या कौशल्यावर शंका असेल किंवा माझं काम तुम्हाला माहीत नसेल तर मी तुमच्यासोबत काम करु शकत नाही. आजही माझ्याकडे अशा स्क्रिप्ट आहेत ज्या फक्त मी या कारणांमुळे स्वीकारलेल्या नाहीत.’