राज्यातील दुष्काळ, शेतक ऱ्यांच्या आत्महत्या या नेहमीच्या विषयांबरोबर डाळींच्या वाढत्या भावावरून पेटलेले राजकारण असे एकेक विषय जमा करत एकीकडे हिवाळी अधिवेशनासाठी राजकारण्यांची तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे अभिनेता अजिंक्य देव, मकरंद अनासपुरे, भारत गणेशपुरे यांच्यासारखी कलाकार मंडळी त्यांचे ‘नागपूर अधिवेशन’ संपवून ते लोकांपर्यंत पोहोचवायच्या तयारीत मग्न आहेत. येत्या ७ डिसेंबरला नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत असतानाच रुपेरी पडद्यावरही ‘नागपूर अधिवेशन’ रंगणार आहे. अधिवेशनाच्या छायेतील नागपूरची कथा या चित्रपटातून पाहायला मिळेल, अशी माहिती दिग्दर्शक नीलेश रावसाहेब जळमकर यांनी ‘वृत्तांत’शी बोलताना सांगितली.
नागपूरमध्ये दर वर्षी हिवाळी अधिवेशन भरते. अधिवेशनाच्या त्या पंधरा दिवसांत एक वेगळेच नागपूर विधानभवनाबाहेर पाहायला मिळते. राज्याचे विषय, त्यांच्या समस्या घेऊन तिकडे विधानसभेत किंवा विधान परिषदेत बोलणारी राजकारणी मंडळी वेगळी..पण या मंडळींमुळे त्या विधानभवनाबाहेर वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते, मोर्चे घेऊन येणारी मंडळी, अनेक आमदार-नामदार मंडळी यांची स्वत:ची स्वतंत्रपणे मोर्चेबांधणी सुरू असते. या सगळ्या गमतीजमती एरवी कु ठेच पाहायला मिळत नाहीत, पण वर्षांनुवर्षे अधिवेशनाला येणारी आणि अगदी मागच्या पानावरून पुढे चालू या वृत्तीप्रमाणे तशीच वावरणारी मंडळी इथे पाहायला मिळतात. यांचे धमाल चित्रण ‘नागपूर अधिवेशन’ चित्रपटात पाहायला मिळेल, असे नीलेश जळमकर यांनी सांगितले. अधिवेशनाला जाण्याची संधी वारंवार मिळत गेली. त्यामुळे अधिवेशनाच्या निमित्ताने ज्या घडामोडी घडतात त्याही जवळून अनुभवल्या होत्या. त्यातून एक मार्मिक शैलीत, या सगळ्या विरोधाभासावर बोट ठेवणारी छान कथा विकसित झाली आणि हा चित्रपट आकाराला आल्याची माहिती जळमकर यांनी दिली.
‘नागपूर अधिवेशन एक सहल’ अशा थेट नावाने हा चित्रपट विषयाला भिडतो. मुख्यमंत्र्याची चहापार्टी, राजकारण्यांची हुर्डापार्टी, अधिवेशन उरतेच कुठे ते? ती एक सहलच असते, त्यामुळे चित्रपटाचे नावही थेट ठेवण्यात आले असल्याचे दिग्दर्शकाचे म्हणणे आहे. त्यातही हिवाळी अधिवेशन यापेक्षा नागपूर अधिवेशन या शब्दांत जास्त वजन असल्याने चित्रपटाचे नाव ‘नागपूर अधिवेशन’ ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अधिवेशन होणार म्हणून त्या काळात नागपुरात मोर्चे काढले जातात, खास योजना-मोहिमा आखल्या जातात, पक्षांच्या कार्यकर्त्यांचे व्यवस्थापन, सरकारी कर्मचाऱ्यांचा गोंधळ, कार्यालयाच्या रंगरंगोटय़ा आणि या सगळ्याची नागपुरात तयार झालेली बाजारपेठ यामुळे हा विषयच नागपूरभोवती फिरतो, असे त्यांनी स्पष्ट केले. अजिंक्य देव या चित्रपटात राजकारणी म्हणून दिसणार आहेत तर मकरंद अनासपुरे, संकर्षण क ऱ्हाडे, विनीत भोंडे, दीपाली जगताप, भारत गणेशपुरे असे अनेक नामी कलाकार या चित्रपटात आहेत.

IMG-20151204-WA0000

Story img Loader