मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. १९ फेब्रुवारी १६३० साली महाराजांचा जन्म झाला. त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस म्हणून शिवजयंती साजरी केली जाते. अख्ख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या महाराजांची जयंती राज्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. राजकीय क्षेत्रापासून ते कलाविश्वापर्यंत सारेच या दिवसाचं महत्व जाणून हा दिवस साजरा करत असतात. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनीदेखील ट्विटरवर एक फोटो शेअर करत या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नागराज मंजुळे सध्या अमेरिकेत असून त्यांनी शिवजयंतीच्या मुहूर्तावर शिवाजी महाराजांच्या वेशातील तरुणासोबतचा फोटो शेअर केला आहे. कन्सॉलेट जनरल ऑफ इंडिया, छत्रपती फाऊंडेशन आणि अल्बनी ढोल पथक यांच्यावतीने न्यूयॉर्क येथे शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या शिवजयंती महोत्सवाला नागराज मंजुळेंना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या मराठी माणसांकडून शिवाजी महाराजांचा इतिहास जागविण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
असा सेल्फी काढण्याचा मोह कधीतरीच होतो
शिवजयंती
New York pic.twitter.com/lzj2RHdREc— nagraj manjule (@Nagrajmanjule) February 19, 2019
दरम्यान, नागराज मंजुळे यांनी फोटो शेअर करत ‘असा सेल्फी काढण्याचा मोह कधी तरीच होतो’, असं कॅप्शन दिलं आहे. हा फोटो त्यांनी ट्विटर आणि फेसबुक अशा दोन्ही ठिकाणी शेअर केला आहे. या फोटोमध्ये शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेला तरुण आणि पाठीमागे मावळ्यांच्या वेशात आणखी दोन तरुण दिसून येत आहेत.